गडचिरोली : शहरानजीकच्या कोटगल येथील माई रमाई बालकाश्रमात सात ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलींना मागील दोन वर्षांपासून प्रचंड यातनांमध्ये जीवन जगावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या भेटीने उघडकीस आला. दोन मुलींनी आपल्या व्यथांची यादीच अध्यक्षांसमोर मांडली. शहरापासून पाच किमी अंतरावर कोटगल येथे माई रमाई बालकाश्रम आहे. येथे विविध वर्गात शिकणाऱ्या सहा मुली व सहा मुले वास्तव्यास आहेत. येथे राहुन शिक्षण घेत असताना बालिकांवर अधीक्षक मागील अनेक दिवसांपासून मानसिक अत्याचार करीत असल्याचे वास्तव या भेटीने उघडकीस आले. बालकाश्रमातील मुलींना कनिष्ठ दर्जाचे जेवण देणे, दररोज झाडू मारायला लावणे, शौचालय साफ करण्याच्या कामासाठी जुंपण्याची धमकी देणे आदी त्रासाचे प्रकार येथे नियमितपणे सुरू होते, अशी माहिती बालकाश्रमातील मुला-मुलींनी अध्यक्षांसमोर मांडली. तसेच येथे वास्तव्याला असलेल्या मुला- मुलींकडून शेतीची कामे तसेच जनावरांचे शेण उचलण्याचेही काम करून घेण्यात येत होते. आजारी पडल्यास तत्काळ डॉक्टरद्वारा उपचारही दिला जात नव्हता, अशी धक्कादायक माहिती अध्यक्षांच्या या भेटीने पुढे आली आहे. बालकाश्रमाला भेट दिली. त्यावेळी अध्यक्ष कुत्तरमारे यांच्या समवेत जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, बालकल्याण समितीचे सदस्य खुणे, मेश्राम, पोलीस उप निरीक्षक पाटील आदी उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे या बालकाश्रमात वास्तव्याला असलेल्या सहा पैकी केवळ एकाच जणाचे पालक जीवंत आहे. बाकी सर्व मुले अनाथ असल्याचेही वास्तव या भेटीतून उघडकीस आले. या घटनेला महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारीही जबाबदार असले पाहिजे, अशी शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)
जि. प. अध्यक्षांसमोर मांडली अत्याचाराची व्यथा
By admin | Updated: February 26, 2015 01:41 IST