वित्तमंत्र्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावाव्या, अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणीचा लाभ दिल्या जात आहे. मात्र सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा पदोन्नतीच्या वेळी ही वेतनश्रेणी काढल्या जाते. अप्रशिक्षित शिक्षकांची सेवा १२ वर्षानंतर देय असलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी, शिक्षकांची वेतन वितरण व्यवस्था सुरळीत करावी, जिल्हा लेखा तथा वित्त अधिकारी तसेच जिल्हा कोषागार यंत्रणा अधिक प्रभावी करावी, शालांत वेतन प्रणालीमध्ये जि. प. शाळांमधील मुख्याध्यापकांना डीडीओ-१ चे अधिकार न देता ती जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यावर द्यावी, वीज बिलासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर, उपाध्यक्ष यशवंत शेंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सत्यपाल मेश्राम यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
जि. प. शिक्षकांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 02:12 IST