गडचिरोली : एप्रिल महिन्यात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यात १० नवीन नगर पंचायती निर्माण केल्या आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येची आता पुनर्ररचना होणार आहे. २०१७ च्या जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने यासाठी नवीन गण गठित करावे लागणार आहे. अनेक जि. प. क्षेत्राचे नावही बदलतील, अशी चिन्ह आहेत. गडचिरोली जिल्ह्यात स्थापनेपासून देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यातील तालुका मुख्यालयाच्या ग्राम पंचायतींना नगर पंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात १० नगर पंचायती स्थापण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर राज्यात सत्तांतरण झाल्यावर नव्या भाजप-शिवसेना सरकारने एप्रिल २०१५ मध्ये ग्राम पंचायत निवडणुका स्थगीत करून कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, आरमोरी या दहा ग्राम पंचायतींना नगर पंचायती करण्याबाबतची अधिसूचना जारी केली व येथे तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त केले. नव्या नगर पंचायती झाल्यामुळे आरमोरी येथील जिल्हा परिषद क्षेत्र कमी झाले आहे. तसेच आरमोरी येथील दोन पंचायत समिती गण, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली येथील प्रत्येकी एक पंचायत समिती क्षेत्र आता कमी झाले आहे. त्यामुळे २०१६ मध्ये होणाऱ्या जि. प. व पं. स. च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्राची पुनर्ररचना करावी लागणार आहे. यात अनेक पंचायत समिती व जिल्हा परिषद क्षेत्राचे नावही बदलतील. विद्यमान स्थितीत चामोर्शी-फराडा जिल्हा परिषद क्षेत्र होते. त्यातून आता चामोर्शीचे नाव वगळावे लागेल व नवीन दुसऱ्या गावाचे नाव या क्षेत्राला जोडावे लागेल. असाच प्रकार एटापल्ली-गुरूपल्ली या जि.प. क्षेत्राबाबतही होईल. यातून एटापल्लीचे नाव वगळावे लागेल व नवीन गावाचे नाव जोडावे लागेल. कोरची-बिहिटेकला या जि.प. गणाचे नावे बिहिटेकलासोबत दुसऱ्या गावाच्या नावाने करावे लागणार आहे. १३ हजार मतदाराचे एक क्षेत्र होते. ते आता ११ हजारापर्यंत येईल व जिल्हा परिषद सदस्याचा आकडाही ५१ वरून ५० तर पं. स. सदस्याचे संख्याबळ १०२ वर ९७ वर येईल. पंचायत समिती गणाचेही नाव या नव्या पुनर्ररचनेत बदलविले जाण्याची शक्यता आहे. प्रशासन सप्टेंबर आॅक्टोबरच्या पूर्वी नगर पंचायतीच्या निवडणुका घेणार आहे. त्यामुळे त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्कल व गणांची फेररचना करण्यास प्रशासनाकडून सुरुवात होईल, अशी चिन्ह आहे. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५१ वरून ५० वर येणार असून नव्या फेर रचनेत जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदार संख्याही कमी होईल. साधारणत: एक ते दीड हजाराने एका जि.प. सर्कलमध्ये मतदारांच्या संख्येत घट येण्याची शक्यता आहे. वाढीव लोकसंख्येच्या आधारावर नवी फेररचना केली जाईल. (जिल्हा प्रतिनिधी)
जि. प., पं. स. गणांची होणार पुनर्रचना
By admin | Updated: July 29, 2015 01:40 IST