गडचिरोली : आर. आर. पाटील हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले गोरगरिबांचे नेते होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा व सामान्य माणसाला हवाहवासा वाटणारा तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाप्रती प्रचंड जिव्हाळा व दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू गमावला, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. येथील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. आर. आर. पाटील उर्फ आबा यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खा. मारोतराव कोवासे होते. मंचावर खा. अशोक नेते, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, लोकनेते नामदेवराव गडपल्लीवार, जि. प. सदस्य जगन्नाथ बोरकुटे, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राकाँचे उपाध्यक्ष हेमंत जंबेवार, प्रकाश ताकसांडे, काँग्रेसचे युवा नेते पंकज गुड्डेवार, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, प्रकाश अर्जुनवार, श्रीनिवास गोडसेलवार, काशिनाथ भडके, माजी जि. प. अध्यक्ष समय्या पसुला, नगर परिषदेचे उपाध्यक्ष रमेश चौधरी, प्राचार्य जगदीश म्हस्के, जनकल्याण प्रतिष्ठानचे सुरेश पद्मशाली आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शोकसंवेदना व्यक्त करताना माजी खा. मारोतराव कोवासे म्हणाले, आर. आर. पाटील यांनी पालकमंत्री पदाच्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा विकासाला मोठी गती मिळाली. सर्व लोकप्रतिनिधींशी व सर्वसामान्य नागरिकांशी समन्वय ठेवणारे सयंमी स्वभावाचे नेते होते. विकासदृष्टी असलेल्या नेत्याला आपण गमावला, हे कायमचे दु:ख राहील, असेही कोवासे यावेळी म्हणाले. खा. अशोक नेते म्हणाले, सर्वांना चालणारा नेता म्हणून आबांची ओळख होती. त्यांनी गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला आबांनी दिशा दिली, असेही खा. नेते यावेळी म्हणाले. माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी सर्वात जास्त जिल्हा दौरे करणारे पालकमंत्री म्हणून आबांची जिल्ह्यात व राज्यात ओळख आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात सर्व पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जिल्ह्याच्या विकासात आबांचे मोलाचे योगदान आहे. हे कुणीही नाकारू शकत नाही, असेही डॉ. उसेंडी यावेळी म्हणाले.भाग्यश्री आत्राम यांनी आपण जि. प. अध्यक्ष असताना आबांनी जिल्ह्याच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. ते आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्या आठवणी सदैव कायम राहतील, असेही त्यांनी सांगितले. हसनअली गिलानी म्हणाले, आबांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हातात घेतल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला वेगळी कलाटणी मिळाली. जिल्ह्याच्या सर्व भागात दौरे करून ते सर्वसामान्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्नही केले, असेही गिलानी यावेळी म्हणाले. प्रकाश ताकसांडे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी तळमळ सतत बाळगणारा नेता आपण गमावला. शांत स्वभाव, संयमी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करणारा लोकनेता गमावल्याचे दु:ख कायम राहील, असेही ते म्हणाले. नामदेवराव गडपल्लीवार म्हणाले, आबांच्या रूपाने गडचिरोलीला वजनदार पालकमंत्री मिळाला. आव्हान म्हणून स्वीकारलेल्या पालकमंत्री पदाला आबांनी न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. असेही त्यांनी सांगितले. जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आबांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासारखा विकासदृष्टी असलेला पालकमंत्री मिळाल्याने मागास जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड सुरू झाली, असे सांगितले.याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करताना आबांच्या विकासाचे योगदान, त्यांनी घेतलेले लोकाभिमूख निर्णय, सर्वसामान्यांशी संपर्क यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी आबांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाला राकाँचे युवा नेते ऋतुराज हलगेकर, रवींद्र वासेकर, अजय कुंभारे, श्यामसुंदर उराडे, संजय बारापात्रे, नगरसेवक नंदू वाईलकर, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हा विकासाचा महामेरू गमावला
By admin | Updated: February 18, 2015 01:26 IST