गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने गायी म्हशी गट वाटप योजना, राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना, विशेष घटक योजनेंतर्गत दुधाळ गटाचे वाटप केले जाते. गत दोन वर्षापासून 'पाच वर्षाकरिता एकदाच अर्ज' या संकल्पनेनुसार अर्ज केलेल्यांना योजनेचा लाभ दिला जाणार होता; परंतु यावर्षी नवीन अर्जासाठी पोर्टल सुरू झालेच नाही. शिवाय जुन्याही लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दुधाळ गट वाटप योजनेवरच विरजण पडल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना शेतीसह जोडधंदा करता यावा यासाठी शासनाच्या वतीने दुधाळ गट वाटप योजना आहे. दोन वर्षापूर्वी सदर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. एकदा अर्ज केल्यानंतर पाच वर्षे सदर योजनेसाठी अर्ज करावे लागणार नाही.
जुलै महिन्यात सुरू होते अर्ज दाखलची प्रक्रियादुधाळ गट वाटप तसेच शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसायासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया जुलै-ऑगस्ट महिन्यात सुरू होते; परंतु मागील वर्षी ही प्रक्रिया सुरू झालेली नाही. अजूनही या प्रक्रियेला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे नवीन शेतकऱ्यांना अर्ज करणे कठीण बनतेय.
वाटप केलेली किती जनावरे सध्या दावणीला?दुधाळ गटांतर्गत गायींचा लाभ• घेण्यासाठी अनेकजण अर्ज करतात खरे, पण घरची जुनीच जनावरे दाखवून लाभ घेतात.यात पंचायत समिती स्तरावरील 3 काही अधिकाऱ्यांचा सहभाग असतो. पाच ते दहा हजार घेऊन तेसुद्धा 'आर्थिक' धन्यता मानतात.
उद्दिष्टही नाहीदुधाळ गट वाटपासाठी जिल्ह्याला यावर्षी उद्दिष्टसुद्धा प्राप्त झालेले नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करू इच्छिणाऱ्या पशुपालकांमध्ये निराशा आहे.
असे आहे अनुदानसर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते.
"दुधाळ गट वाटपासाठी जिल्ह्याला अजूनही उद्दिष्ट प्राप्त झालेले नाही. यावर्षी पोर्टल खुले झालेले नाही. मागील सत्रात ज्यांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी लाभार्थी हिस्सा भरून लाभघ्यावा."- डॉ. विलास गाडगे, उपायुक्त, पशुसंवर्धन, गडचिरोली