लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटलांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत १०० टक्के मतदान व दारूमुक्त निवडणूक यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत आरमोरीचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गोंडसे, चेतन सिंग चव्हाण व मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिणखेडे उपस्थित होत्या.
यावेळी बुथवर कुणीही धिंगाणा घालणार नाही. यासाठी पोलीस पाटील यांनी प्रयत्न करावे. गावात दारू येणार नाही, यासाठी गावागावातील गाव संघटना प्रयत्न करतील. त्यांना प्रत्येक गावातील पोलीस पाटील यांनी सहकार्य करावे, निवडणुकीदरम्यान दारूविक्री बंद असलेल्या गावात अवैध दारू येऊन पूर्ववत दारू सुरू होणार नाही यावर नजर ठेवणे. कोणत्याही गावात दारू येत असल्यास किंवा धिंगाणे झाल्यास याची तात्काळ माहिती पोलीस स्टेशनला द्यावी, आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत जवळपास ७० पोलीस पाटील उपस्थित होते.