चित्तरंजनपूर येथे बैठक : आमदार व वीज अधिकाऱ्यांची उपस्थितीचामोर्शी : तालुक्यातील येनापूरजवळील चित्तरंजनपूर येथील राजस्व भवनात आमदार डॉ. देवराव होळी व वीज कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान येनापूर क्षेत्रातील वीज समस्या सोडविण्याचे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.यावेळी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कांबळे, आलापल्लीचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे, चामोर्शीचे उपकार्यकारी अभियंता पी. यू. ठाकरे, भारतीय जनता पार्टी यूवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील वरघंटे, भाजपा नेते मनमोहन बंडावार, पं.स. सदस्य रमेश दुर्गे, भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री विनोद गौरकार उपस्थित होते. तालुक्यातील येनापूर परिसरात यावर्षीच्या पावसाळ्यात विजेची समस्या वाढली आहे. याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी आमदार डॉ. होळी यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर खंडीत वीज पुरवठ्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त होते. नागरिकांच्या तक्रारीवरून डॉ. देवराव होळी यांनी नागरिक व विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांची थेट भेट घडवून आणली. नागरिकांनी त्यांच्या क्षेत्रातील समस्या वीज अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या. या बैठकीला शेतकरी सुध्दा सहभागी झाले होते. या परिसरात कमी वीज दाबाचा पुरवठा होत असल्याने मोटार पंप सुरू होत नसल्याची मुख्य समस्या शेतकऱ्यांनी वीज अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. (तालुका प्रतिनिधी)
वीज समस्या सोडविण्याबाबत चर्चा
By admin | Updated: September 19, 2016 02:02 IST