गडचिराेली : तालुक्यासह जिल्हाभरात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अनेक जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. सतत मागणी करूनही जीर्ण इमारती निर्लेखित केल्या नाहीत.
वैयक्तिक शौचालयांची गावांत कमतरता
गडचिराेली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, आदी दुर्गम तालुक्यांतील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचास बसतात.
खुल्या जागा ठरताहेत कुचकामी
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वार्डांमध्ये ओपन स्पेस आहेत. मात्र, काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. न. शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी आहे.
शहरातील नाल्यांमध्ये फवारणीची मागणी
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डांतील डासांमुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले असून, अनेक घरी लोक तापाने फणफणत आहेत. सर्दी, पडसेसह अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे नाल्यांचा उपसा करून सर्वच वाॅर्डातील नाल्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
अनेक दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहेत. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी आहे.
ऑनलाईन सुविधेपासून ग्रामपंचायती वंचित
गडचिरोली : ग्रामपंचायत स्तरावरील संपूर्ण दस्तावेज ऑनलाईन करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र, अजूनही बऱ्याचशा ग्रामपंचायती ऑनलाईन झाल्या नाहीत. त्यामुळे आधुनिक सुविधांपासून वंचित आहेत.
अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहानमोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे गावकऱ्यांना धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत. त्यामुळे या गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
केंद्रांअभावी नागरिकांची पायपीट
कोरची : तालुका भौगोलिक विस्ताराने लहान आहे; परंतु तालुक्यात अनेक गावे आहेत. लोकांसाठी निर्माण करण्यात आलेले महा-ई-सेवा केंद्र अपुरे आहेत. नागरिकांना ६० ते ७० कि.मी.चे अंतर कापावे लागते. त्यामुळे महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
अरुंद रस्त्यामुळे अपघाताचा धोका
अहेरी : येथील मुख्य मार्ग अरुंद असल्याने, दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यानंतर इतर वाहने जाण्यासाठी मार्ग राहत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. उपविभागातील अहेरी हे महत्त्वाचे शहर आहे. अनेक कार्यालये या ठिकाणी असल्याने, ग्रामीण व दुर्गम भागातील जनता विविध कामांसाठी अहेरीत येत राहते. शहरातील गांधी चौकातील मुख्य मार्ग अरुंद आहे.
कोरची शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
कोरची : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने, परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.