लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यात यावर्षी १९९४ नंतरचा सर्वाधिक पाऊस झाल्याने चांगलाच हाह:कार उडाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात २५०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद घेण्यात आली. आठवडाभर अक्षरश: पावसात राहिल्याने निर्माण झालेल्या आरोग्यविषयीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी आरोग्य व महसूल विभागाची चमू तिथे पोहोचली आहे. परंतू दुर्गम भागातील नाले अजूनही तुडूंब भरून असल्यामुळे त्या गावांमध्ये जाणेही कठीण होत आहे.गेल्या ३ ते १० सप्टेंबरच्या सकाळपर्यंत, म्हणजे पूर्ण आठवडाभर पूर परिस्थितीमुळे भामरागडसह अनेक ;गावे संपर्काबाहेर होती. ६ सप्टेंबरपासून पुराचे पाणी गावात शिरल्याने ७० टक्के भामरागड पुराच्या पाण्यात होते. दुर्गम भागातील अनेक गावांचा तर अजूनही संपर्क तुटलेलाच आहे. मात्र या परिस्थितीत जीवित आणि वित्तहाणी झालेल्यांना तातडीने मदत देण्यासाठी पंचनामे करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाची चमू या तालुक्यात पाठविली. शिवाय जलजन्य आजारांची साथ उद्भवू नये म्हणून आरोग्य तपासणी, उपचार व जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू या तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे. बहुतांश गावांना पोहोचण्यासाठी जंगलांमधून वाहात येणारे छोटे-छोटे नाले पार करावे लागतात. हे सर्व नाले तुडूंब भरून असल्यामुळे गावात पोहोचणेच अशक्य होत आहे.तूर्त तरी कोणत्याही गावात साथरोगाचा उद्रेक झालेला नसला तरी पुढील काही दिवस मोठी दक्षता घ्यावी लागणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात पंचनाम्यांसाठी अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 12:23 IST
जनजागृतीसाठी आरोग्य विभागाची चमू गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील सर्व गावांमध्ये फिरण्यासाठी पाठविण्यात आली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा तडाखा बसत असल्याने या चमूला गावांमध्ये फिरणेही कठीण होत आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात पंचनाम्यांसाठी अडथळे
ठळक मुद्देमहसूल व आरोग्य विभागाच्या चमुपुढे गावात पोहोचण्याचे आव्हान