तीन हजार मजुरांना कामाची प्रतीक्षा : तहसीलदारांनी मोर्चेकऱ्यांपर्यंत पोहोचून निवेदन स्वीकारलेआरमोरी : नगर पंचायत क्षेत्रात रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी आरमोरी येथील नोंदणीकृत मजुरांनी तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. माजी जि.प. सदस्य वेणूताई ढवगाये यांच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चात शेकडो मजूर सहभागी झाले होते. आरमोरी नगर पंचायत क्षेत्रात जवळपास तीन हजार नोंदणीकृत मजुरांनी रोजगार हमी योजनेचे काम देण्यात यावे, यासाठी नगर पंचायत प्रशासनाकडे ‘नमुना-४’ चे प्रपत्र भरून कामाची मागणी केली. मात्र प्रशासकांनी ‘नमुना-४’ मजुरांना परत करून कामाची मागणी फेटाळली. यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतीचेही काम मिळत नाही. त्यामुळे मजूरवर्ग आर्थिक अडचणीत आला आहे. मजुरांनी मागील दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी व नगर पंचायतीचे प्रशासक यांना काम उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले होते. दोन आठवड्यांपूर्वी शेकडो मजुरांनी न.पं. प्रशासकाला घेरावही घातला होता. मात्र शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याचे कारण पुढे करून नगर पंचायत प्रशासनाने मजुरांच्या कामाच्या मागणीची देखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी वेणूताई ढवगाये यांच्या नेतृत्वात तहसीलवर मोर्चा काढला. तहसीलदार मनोहर वलथरे यांनी मोर्चाच्यास्थळी येऊन निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नेतृत्व सुनिल नंदनवार, महेंद्र शेंडे, राजू कंकटवार, प्रदीप हजारे, सुधीर सपाटे, भोलानाथ मेश्राम, राजू मोंगरकर, ज्ञानेश्वर ढवगाये, नत्थू भरणे, खुशाल नैताम, पुंडलिक दहीकर, विकास बोरकर, गोपाल नारनवरे, उमेश शेंडे, कुंदन निकुरे, ज्ञानेश्वर लोणारे, सचिन मानकर, केशव हेडाऊ, अशोक गोवर्धन, संजय मडावी, अनिल भोयर, दौलत मेश्राम, दिनेश शेबे, नंदू मने, प्रितम जांभुळे, अरूण दुधबळे यांनी केले. (वार्ताहर)
रोहयो कामासाठी नोंदणीकृत मजुरांचा तहसीलवर धडकला मोर्चा
By admin | Updated: February 2, 2016 01:24 IST