संतप्त शिक्षकांची पं. स. वर धडक : आंदोलन छेडण्याचा महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा इशाराआरमोरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाची तरतूद उपलब्ध असतानाही स्थानिक पंचायत समिती कार्यालयाच्या शिक्षण विभागातील एका लिपिकाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. वेतनाअभावी अडचणीत सापडलेल्या संतप्त शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती आरमोरीच्या बॅनरखाली गुरूवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी प्रलंबित वेतनाच्या प्रश्नांवर आरमोेरीचे संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र त्यात सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त शिक्षकांनी पंचायत समितीवर धडक दिली. आरमोरी पंचायत समितीअंतर्गत शालार्थ प्रणालीनुसार आॅनलाईन वेतन दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येते. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांच्याकडून पंचायत समितीकडे एमटीआर ४४ पाठविण्यात येते. त्यानंतर पंचायत समितीकडून आॅफलाईन वेतन बिल तयार करून लेखाधिकाऱ्यांकडे सादर केले जाते. त्यानुसार शिक्षकांच्या वेतनाची तरतूद पाठविण्यात येते. मात्र शिक्षण विभागातील लिपिकाकडून शिक्षकांच्या वेतन बिलामध्ये नेहमी चुका होतात. एका केंद्राच्या शिक्षकांचे वेतन बिल चुकले तर उर्वरित सर्व केंद्रातील शिक्षकांचे वेतन बिल बँकेत पाठविले जात नाही. याचा परिणाम तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांच्या वेतनावर होतोे. वेळेवर वेतन होत नाही. परिणामी शिक्षक आर्थिक अडचणीत सापडतात. प्रलंबित वेतनाबाबत गुरूवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पं. स. चे लेखाधिकारी महेश कोत्तावार यांच्याशी चर्चा केली. येत्या दोन दिवसात शिक्षकांचे वेतन न झाल्यास पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे पदाधिकारी व उपस्थित शिक्षकांनी दिला. (शहर प्रतिनिधी)
वेतनाची तरतूद असूनही शिक्षकांचे वेतन प्रलंबित
By admin | Updated: June 10, 2016 01:32 IST