जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : माणिक तुरे यांची मागणीगडचिरोली : चामोर्शी-वाघदरा, आष्टी-चामोर्शी रस्त्याच्या मधोमध असलेल्या तलावामध्ये गडचिरोली, चामोर्शी रोडलगत तलावाच्या पात्रात आणि चामोर्शी येथील साजा क्रमांक आठ मधील ८.४८ हेक्टरच्या शासकीय जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी व मासेमार बांधव अडचणीत सापडले आहेत. शिवाय शासकीय कार्यालयाच्या इमारतींना जागा मिळेनासी झाली आहे. त्यामुळे सदर शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी स्वाभीमान रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.या संदर्भात तुरे यांनी २३ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चामोर्शी शहरालगतच्या व तालुक्यातील मामा तलावात काही धनाढ्य नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमीत जागेवर राईसमिलसारखे उद्योग तसेच धानपीक घेतले जात आहे. परिणामी तलावाचे पात्र कमी होऊन शेतकऱ्यांना शेती सिंचनाची समस्या भेडसावत आहे. तसेच मासेमार बांधवांचा मत्स्यपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. तलावातील व शासकीय जागेवरील अतिक्रमण तत्काळ काढून शेतकरी व मासेमार बांधवांना न्याय द्यावा, असे माणिक तुरे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)तहसीलदारांकडून कोर्टाच्या आदेशाची पायमल्लीचामोर्शी येथील साजा क्रमांक आठ मधील ८.४८ हेक्टर इतक्या शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. संबंधित अतिक्रमणधारकांनी सदर जागा स्वत:ला मिळावी, यासाठी दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज १४ जून २०१६ रोजी गडचिरोली न्यायालयाने रद्द केला आहे. तसेच या जागेवर असलेले गैरअर्जदारांचे अतिक्रमण काढून टाकावे, असे आदेश दिले आहेत. मात्र चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडून सदर जागेवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाची एसडीओ व तहसीलदारांकडून पायमल्ली होत आहे, अशी माहिती माणिकराव तुरे यांनी दिली आहे.जागेअभावी एसटी आगार रखडलेराज्य शासनाने चामोर्शी येथे राज्य परिवहन महामंडळाचे एसटी आगाराची इमारत १९८५ ते १९९० दरम्यान मंजूर केली आहे. सदर कार्यालयाच्या इमारतीसाठी एसटी महामंडळाने एसडीओ कार्यालयाकडे अनामत रक्कम सुध्दा भरलेली आहे. मात्र जागा मिळत नसल्याने या कार्यालयाच्या इमारतीचे काम रखडले आहे. तलाव व शासकीय जागेवरील अतिक्रमण काढल्यास इमारतीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते, या बाबत प्रशासनाने कार्यवाही करून चामोर्शीतील एसटी आगार कार्यालय विनाविलंब कार्यान्वित करावा, अशी मागणी तुरे यांनी केली आहे.
चामोर्शीच्या तलावातील अतिक्रमण हटवा
By admin | Updated: September 20, 2016 00:51 IST