आरमोरी : आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. मात्र, धानाची खरेदी करण्यासाठी आरमोरीत गोदाम मिळत नसल्याने धान खरेदी केंद्र कसे सुरू करावे, असा पेचप्रसंग आरमोरी शेतकी खरेदी-विक्री संस्थेपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू होणार की नाही? अशी शंका निर्माण झाली आहे.
रब्बी पणन हंगाम २०२०-२१ करिता उन्हाळी धान खरेदीकरिता जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या सूचनेनुसार खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी सातबारा, नमुना आठ अ, आधारकार्ड व बँक पासबुक झेराॅक्स जमा केले. मात्र, खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होत असल्याने अनेक गरजू व आर्थिक चणचण असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आपले धान अतिशय अल्प म्हणजे बाराशे ते तेराशे रुपये क्विंटल भावाने खासगी व्यापाऱ्याला विकले आणि विकत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. धानाची साठवणूक करून ठेवण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनकडे स्वतःची गोदाम व्यवस्था नाही. शिवाय भाड्याने गोदाम उपलब्ध होत नसल्याने धानाची खरेदी सुरू करण्यात आली नाही. आरमोरी तालुक्यात जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली असून मागील वर्षीच्या तुलनेत तालुक्यात पाचपटीने मक्याचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, यावर्षी मक्याची हमीभावाने खरेदी करण्यास अद्यापही कुठलेच आदेश आले नाही त्यामुळे मका उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. एक ते दाेन दिवसात धान खरेदी केंद्र सुरू हाेईल, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांनी दिली.