शेतकरी संकटात : जिल्ह्यात केवळ २९ टक्केच पेरण्या आटोपल्यागडचिरोली : जून महिन्यात केवळ ५९ मिमी पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यातही पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात केवळ २९ टक्के पेरण्या आटोपल्या असून शेतात पेरलेले पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. भंडारा जिल्ह्याच्या इटियाडोह प्रकल्पातून आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दिना प्रकल्प गतवर्षी या कालावधीत १०० टक्के भरला होता. यंदा मात्र या प्रकल्पात केवळ ३१.१२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. यंदा खरीप हंगामासाठी १८५६६० हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येणार होती. सध्या केवळ २९ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे व प्रखर उष्णतामानामुळे शेतात लागवड करण्यात आलेले रोपटे करपण्याची शक्यता आहे. काही शेतकरी बैलबंडी, ट्रॅक्टरद्वारे ड्रमने पाणी आणून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ १० टक्केच पेरणीमृग नक्षत्राचा जेमतेम पाऊस पडल्यानंतर पावसाने दडी मारली. यामुळे चामोर्शी तालुक्यातील धानपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट ओढावले आहे. चामोर्शी तालुक्यात एकूण धान क्षेत्रापैकी केवळ १० टक्केच क्षेत्रात धानपिकाची पेरणी करण्यात आली आहे. विहिरी व सिंचन सुविधेअभावी रोवणी कशी करावी, या चिंतेत तालुक्यातील शेतकरी सापडले आहेत.चामोर्शी तालुक्यात एकूण २७ हजार हेक्टर धान क्षेत्र आहे. यात मक्का ३६५ हेक्टर क्षेत्रात, तृणधान्य ६० हेक्टर, तूर १ हजार २०० हेक्टर, मूग २० हेक्टर, उडीद १० हेक्टर, कडधान्य १२० हेक्टर, सोयाबीन ३ हजार १०० हेक्टर, तीळ १०० हेक्टर, कापूस १ हजार ५०० हेक्टर असे एकूण ३३ हजार ४४५ हेक्टर पीक क्षेत्र खरीप हंगामातील आहे. गतवर्षी ३० जून पर्यंत ४१२ मीमी पाऊस तालुक्यात झाला होता. यावर्षी मात्र फक्त ४४ मिमी पाऊस तालुक्यात झाला आहे. यावर्षीच्या पावसाची आकडेवारी केवळ १० टक्के आहे. २७ हजार हेक्टर धान क्षेत्रासाठी, २ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात पऱ्हे टाकावे लागतात. परंतु केवळ २ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात धानाचे पऱ्हे टाकले आहे. सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी धानपिकाचे पऱ्हे टाकले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे उपलब्ध असलेल्या सिंचन सुविधेच्या भरवशावर टाकलेल्या पऱ्ह्याची टक्केवारी १० आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत चामोर्शी तालुक्यात १५ ते २० टक्के रोवणी आटोपली होती. यावर्षी मात्र रोवणीचे प्रमाण शुन्य टक्के आहे. शेती जड धानासाठी प्रसिध्द आहे. येथील शेतकरी श्रीराम, मनोर व तत्सम जड जातीच्या धानपिकाची लागवड करतात. यासाठी मोठा कालावधी लागतो. यावर्षी पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांना हलक्या धानपिकाकडे वळावे लागणार आहे. हलक्या धानपिकाचे पऱ्हे टाकण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागणार आहे. वावर असलेल्या शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाचे नियोजन करावे, यासाठी बी-बियाणे, खते, औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती पं.स. कृषी विभागाने दिली आहे.
पऱ्हे वाचविण्यासाठी सोडले धरणाचे पाणी
By admin | Updated: July 10, 2014 23:34 IST