आरमोरी : येथील बँक आॅफ इंडियाच्या एकमेव शाखेत दररोज ग्राहक पैसे भरणे व काढण्याकरिता येतात. या बँकेत खातेदारांची संख्या लक्षणीय आहे. परंतु येथील बँक शाखेत कर्मचारी व काऊंटरचा पुरेसा अभाव असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांना ताटकळत रांगेत राहावे लागते. त्यामुळे बँक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.बँक आॅफ इंडियाच्या शाखेत तालुक्यातील अनेक गावातून दररोज बँक खातेदार कामानिमित्त येत असल्याने येथे खातेदारांची गर्दी असते. मोजकेच कॉऊंटर व्यवहार करण्याकरिता असल्याने दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते. कामाचा व्याप लक्षात घेता येथील शाखेत कॉऊंटरची संख्या वाढविणे आवश्यक होती. परंतु ग्राहकांची दशा होत असतांना बँक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एटीएम मशीन वारंवार बंद होत असल्याने ग्राहकांना बँक शाखेतूनच व्यवहार करावा लागतो. त्यामुळे एटीएम नियमित सुरळीत सुरू ठेवावे शिवाय बँक शाखेचे कॉऊंटर त्वरित वाढवावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. या संदर्भात बँक शाखा व्यवस्थापक कपूर यांची विचारणा केली असता, बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या व कॉऊंटर वाढविण्याकरिता वरिष्ठांना सांगितले आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहक त्रस्त
By admin | Updated: April 8, 2015 01:18 IST