महेंद्र रामटेके।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : नगरसेवक पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यापासून विविध प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विविध प्रभागातील उमेदवारांची चाचपणीही केली. मात्र महत्त्वपूर्ण असलेल्या शहराच्या प्रथम नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत अद्यापही निघालेली नाही. नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने आरमोरीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होते, याकडे आरमोरीकरांचे लक्ष लागले आहे. या आरक्षण सोडतीची उत्सुकताही आता शिगेला पोहोचली आहे.आगामी होणाऱ्या आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या आरक्षणाची प्रभागनिहाय सोडत प्रशासनाच्या वतीने दोन महिन्यापूर्वी काढण्यात आली. मात्र नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची प्रतीक्षा राजकीय नेत्यांसह इच्छुक उमेदवारांना सुद्धा आहे. राजकीय, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया आरमोरी येथील नगर पंचायतीला यावर्षी नगर परिषदेचा दर्जा मिळाला. आता प्रथमच नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. आरमोरी नगर परिषदेत आरमोरी, शेगाव, पालोरा, अरसोडा आदी गावांचा समावेश आहे. नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर निवडणुकीच्या व प्रभागाच्या दृष्टीने प्रशासनाने वॉर्ड फार्मेशन केले. दोन महिन्यांपूर्वी नगर परिषदेच्या एकूण आठ प्रभागासाठी १७ नगरसेवक पदाच्या आरक्षणाची सोडत काढली. आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर काँग्रेस, भाजपा, शिवसेनासह अन्य पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दीही झाली. इच्छुक व पक्षाकडून उमेदवारी मिळणाऱ्या अनेकांनी आपल्या प्रभागात जनसंपर्कही सुरू केला. विविध उत्सव व सणानिमित्त संभाव्य उमेदवारांचे मोठमोठे पोस्टर व बॅनरही शहरात झळकत आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसुद्धा केली आहे.कोेणत्या पक्षाकडून कोण उभा राहणार? याबाबतची चर्चाही शहरात रंगत आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपापल्या पक्षातील इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांची कमान सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार देण्यावर प्रमुख राजकीय पक्षाचा भर राहणार आहे.आरमोरी नगर परिषदेची पुढे होणारी ही निवडणूक प्रथम असल्याने या निवडणुकीचे इतिहासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व राहणार आहे. नगर परिषद निवडणुकीनंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू असलेल्या आरमोरी शहराच्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालावर राजकीय पक्षांसाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे भवितव्यही ठरणार आहे. त्यामुळे विविध अंगाने महत्त्वपूर्ण असलेल्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीकडे आरमोरीकरांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:26 IST
नगरसेवक पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यापासून विविध प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विविध प्रभागातील उमेदवारांची चाचपणीही केली. मात्र महत्त्वपूर्ण असलेल्या शहराच्या प्रथम नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत अद्यापही निघालेली नाही.
नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची उत्सुकता वाढली
ठळक मुद्देआरमोरी नगर परिषद : थेट जनतेतून होणार अध्यक्षांची निवड; इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला