अहेरीत कार्यक्रम : ३७ बटालियनतर्फे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : अहेरी प्राणहिता पोलीस मुख्यालयात तैनात सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने सीआरपीएफचा ५० वा स्थापना दिन शनिवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना होते. याप्रसंगी द्वितीय कमान अधिकारी डी. के. शर्मा, ९ बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी पी. एस. ढपोला, सीएमओ एन. के. प्रसाद, उपकमांडंट संजय कुमार पुनिया, उपकमांडंट प्रदीप राणा, ९ बटालीयनचे उपकमांडंट पवन कुमार, सुबेदार, भूपेश झाडे उपस्थित होते. १ जुलै १९६८ मध्ये केरळ राज्यात रिझर्व्ह बटालीयन (द्वितीय राज्य आर्म पोलीस) ला केंद्रीय राखीव पोलीस बलात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून केंद्रीय राखीव पोलीस बलाची ३७ बटालीयन देशात शांती, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. सदर बटालीयन पोलीस उपमहानिरीक्षक समुह केंद्र व रेंज गांधीनगर तसेच पोलीस महानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल पश्चिमी क्षेत्रात कार्यरत आहे. सदर बटालीयन आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मनिपूर, उत्तरप्रदेश, आसाम, त्रिपुरा, पंजाब, चंदीगढ आदी राज्यात अंतर्गत सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, प्रतिविद्रोह दमन आदी कार्य करीत आहे. सध्या बटालीयन गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात सक्रिय आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बटालीयनचे अधिकारी व जवानांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान सैनिक संमेलन, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित कारण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये जवानांनी भाग घेतला. जवानांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे आवाहन करण्यात आले.
सीआरपीएफचा स्थापना दिन
By admin | Updated: July 2, 2017 02:06 IST