कॅम्प वसला : १०० जवान पोहोचले; नक्षल कारवायांवर प्रतिबंधएटापल्ली : नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या एटापल्ली येथे केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बेस कॅम्प लावण्यात आला आहे. एकाच दिवशी एटापल्ली, हेडरी, हालेवारा, कोटमी, कसनसूर, गट्टा या सहा ठिकाणी तुकड्या दाखल झाल्या आहेत. एका तुकडीत १३५ ते १५० जवान असतात. जवळपास ८१० ते ९०० च्या संख्येत सीआरपीएफ जवान एटापल्ली तालुक्यात दाखल झाल्याने नक्षल कारवायांना आता प्रचंड धक्का बसणार आहे. एटापल्ली येथे सीमा सडक संघटन (बीआरओ) चा कॅम्प काही वर्षांपूर्वी होता. त्याच जागेवर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा कॅम्प लावण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या बाजुला एटापल्ली-जिमलगट्टा मार्गावर हा कॅम्प लागलेला आहे. येथे बीआरओ कॅम्प वास्तव्याला होता. एटापल्ली-गट्टा मार्गावर असलेल्या बीआरओ कॅम्पकडून आलदंडी नदीच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना सन २००३ मध्ये या कॅम्पवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता व वाहने जाळले होते. बीआरओ अभियंता एम. गणेशन यांची हत्या केली होती. तेव्हापासून हा बीआरओ कॅम्प बंद पडून तब्बल १३ वर्षांपासून खाली अवस्थेत ही जागा होती. बीआरओच्या या जुन्या इमारतीत काही नवीन टिनाचे शेड बांधून सीआरपीएफ कॅम्प सुरू करण्यात आला आहे. या कॅम्पचे बरेच विस्तारित बांधकाम व्हायचे अजून शिल्लक आहे. संरक्षक भिंतीचेही काम अर्धवट स्थितीत आहे. तारेचे कम्पाऊंडसुद्धा पूर्ण झालेले नाही. एटापल्लीवगळता इतर ठिकाणी पोलीस ठाण्याच्या आवारातच सीआरपीएफ कॅम्प लावण्यात आले आहे. एटापल्ली तालुक्यात गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या जवानांनी व सी-६० जवानांनी उल्लेखनीय कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. कोटमी, हालेवारा, बुर्गी, हेडरी येथे पोलीस ठाणे उघडून नक्षल्यांचा थेट सामना करण्याची हिंमत या ठाण्याअंतर्गत कार्यरत अधिकारी व जवांनानी दाखविली. याचबरोबर दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण या पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढाकारानेच झालेत. त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील नक्षल कारवाया नियंत्रणात ठेवण्यात पोलीस दलाला यश आले. अशी स्थिती असताना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या कशासाठी आणण्यात आल्या, असा प्रश्न नागरिकांनाही पडला आहे. पुन्हा दुसरी तुकडीही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे रूप येणार आहे. एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर लोह प्रकल्पासाठी उत्खननाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला होत असलेला विरोध व विविध राजकीय पक्षांचे वेगवेगळे मतप्रवाह असल्याने येथून लोह खनिजाची वाहतूक करणे अडचणीचे जाऊ नये, याकरिता या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कंपन्या आणण्यात आल्या, असे बोलले जात आहे. सीआरपीएफच्या आगमनामुळे सूरजागड प्रकल्प विरोधातील आंदोलनाची धारही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)
सीआरपीएफ बटालियन एटापल्लीत दाखल
By admin | Updated: April 27, 2016 01:19 IST