देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्टपर्यंत वैनगंगा नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकरी पुरते बरबाद झाले. दरम्यान स्थानिक तलाठ्यांच्या माध्यमातून मोका चौकशी करून तसा अहवालदेखील मागवण्यात आला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर पूरपीडित शेतकऱ्यांना पीककर्ज माफीचा अद्यापही लाभ देण्यात आला नाही. त्यातच संबंधित बँकांनी वसुलीसंदर्भात नोटीस बजावल्या असल्याने आर्थिक संकटात असलेले शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.
वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करत जगावे लागत असल्याचे दिसून येते. अत्यल्प उत्पादन हाती लागल्याने वार्षिक आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.
नदीकाठावरील शेतकऱ्यांना महापुराचा जबर फटका बसला असल्याचे २४ डिसेंबर २०२० रोजी केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष दिलेल्या भेटीतून व मोका चौकशीतून स्पष्ट झाले होते. दरम्यान, तसा अहवालही शासन दरबारी सादर करण्यात आल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांना दिली होती. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही शासकीय स्तरावरून तुटपुंजी मदत देण्याऐवजी झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात आर्थिक मदतही देण्यात आली नाही. नियमित पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात आली नसताना बँकांनी पीककर्ज वसुलीसाठी तगादा लावला असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबाधित शेतकऱ्यांना संपूर्ण पीककर्ज माफी देऊन सातबारा कोरा केला होता, त्याच धर्तीवर येथीलही शेतकऱ्यांचे संपूर्ण पीककर्ज माफ करण्याची तत्काळ कारवाई करून तसे निर्देश संबंधित बँकांना देण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जाऊ लागली आहे.