१ कोटी ९६ लाखांची अफरातफर देसाईगंज : सहायक निबंधकाच्या लेखा परिक्षणात येथील राजश्री शाहू महाराज पतसंस्थेच्या संचालक मंडळ व एजंटनी तब्बल १ कोटी ८६ लाख रूपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाने पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे देसाईगंज पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळातील संचालक व एजंटवर भादंविचे कलम ४२०, ४०५, ४०६, ४६८, ४७१, ३४, १२० ब अन्वये गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये राजश्री शाहू महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष बाबा पडवेकर, उपाध्यक्ष द्वारकादास पनपालीया, संचालक मीना शेंडे, चेतन विधाते, मंगेश गोस्वामी, गुलाब मोहम्मद मिर्झा, प्रियंका पिल्लेवान, राजेंद्र वालदे, मुकुंदराव तागडे, लिलाधर खोब्रागडे, अमरजीतसिंग चावला, भगवान शेंडे, गौतमी ठवरे तसेच जगदीश बोरकर, ज्योत्सना कावळे, मेघा पडवेकर, कमलेश रासेकर, टीना खोब्रागडे, अतिका शेंडे, नितीन दिघोरे, अनिल वानखेडे, जाहीद बेग मिर्झा, मिस्बाइल कादिर शेख यांचा समावेश आहे. राजश्री शाहू महाराज पतसंस्थेच्या संचालक मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांच्या रकमेची अफरातफर सुरू केली होती. गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही रक्कम परत न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी ओरड सुरू केली. दरम्यान पतसंस्थेच्या कार्यालयात तोडफोडही करण्यात आली. त्यानंतर स्थानिक सहायक निबंधक कार्यालयाने सन २०१५-१६ पासून या पतसंस्थेवर प्रशासक बसविले. प्रशासक म्हणून कार्यरत लेखा परीक्षक डी. जी. काळे यांनी सन २०१४-१५ वर्षातील या संस्थेचे लेखा परीक्षण केले. यात अध्यक्ष पडवेकर यांच्यासह संचालक मंडळाने १ कोटी ८६ लाखांची अफरातफर केल्याचे लक्षात आले. (वार्ताहर)
पतसंस्थेच्या संचालक व एजंटवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 01:04 IST