जिमलगट्टा : अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुका निर्मितीची मागणी १५ वर्षांपासून शासनस्तराव प्रलंबित आहे. तालुका निर्मिती रखडल्याने या भागातील नागरिकांना ६० ते ७० किमी अंतर कापून अहेरी येथे शासकीय कामांसाठी हेलपाट्या माराव्या लागतात. यात वेळ, पैसा वाया जात असल्याने जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी जिमलगट्टा तालुका संघर्ष समितीच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जिमलगट्टा येथे मंडळ कार्यालय असून या कार्यालयाअंतर्गत ग्राम पंचायत जिमलगट्टा, वेडमपल्ली, उमानूर, मरपल्ली, रेगुलवाही, गोविंदगाव, किष्टापूर, देचली, पेठा, कोंजेड, रेपनपल्ली, कमलापूर, राजाराम, मांड्रा, दामरंचा, खांदला ग्राम पंचायतींचा समावेश आहे. मंडळ कार्यालयाअंतर्गत एकूण ६७ गावे असून या गावातील एकूण लोकसंख्या ४० ते ५० हजारांच्या आसपास आहे. परिसरातील बहुतांश भाग दुर्गम आहे. लोवा, कल्लेड येथील नागरिकांना १० ते १५ किमीची पायपीट करून बस पकडावी लागते. त्यांना तालुक्याची कामे करताना दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत असतो. मंडळ कार्यालय, शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, विद्युत उपकेंद्र, बँक, वन विभाग, वनविकास महामंडळ कार्यालय, दूरभाष केंद्र आदी महत्त्वपूर्ण कार्यालय या भागात आहेत. ग्रामीण रुग्णालय सुरू करणे, पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करावा, प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता. निवेदन देताना पं. स. सदस्य ऋषी पोरतेट, श्रीनिवास गावडे, प्रभाकर यादावार, वहिद पठाण, जयराम आत्राम, मल्लाजी आत्राम, महेश मद्देर्लावार, वसंत पेंदाम, शब्बीर सय्यद, ईश्वर कोठा उपस्थित होते. (वार्ताहर)
जिमलगट्टा तालुका निर्माण करा
By admin | Updated: October 9, 2015 02:00 IST