राज्यपालांच्या दत्तक भामरागडची व्यथा : दोन किमीचा करावा लागतो प्रवासरमेश मारगोनवार भामरागडराज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याच्या समस्या कोणतेही सरकार आले तरी सुटण्याची चिन्ह दिसत नाही. या भागात दूरसंचार सेवेविषयी प्रचंड तक्रारी असून या संदर्भात केंद्र सरकार कमालीचे उदासीन असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील भामरागड तालुका मुख्यालयात भारत संचार निगमचे दूरसंचार व मोबाईल कव्हरेज आहे. परंतु अनेकदा येथील दूरसंचार व्यवस्था नादुरूस्त होऊन बंद पडून जाते. ती महिनोगणती सुरूच होत नाही. त्यामुळे नागरिक, दूरध्वनी व भ्रमणध्वनी ग्राहक त्रस्त झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून भामरागडातील मोबाईल कव्हरेजही गायब झाले असून स्थानिक नागरिकांना दोन किमीचा प्रवास करून हेमलकसा येथे यावे लागते. येथे एक पेट्रोलपंप वर्षभरापूर्वी सुरू झाला होता. मात्र पेट्रोलचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तो बंद झाला. भामरागडचे नागरिक या बंद पेट्रोलपंपाच्या परिसरातून आपल्या भ्रमणध्वनीचे कव्हरेज घेतात. त्यासाठी मोठी गर्दी या पेट्रोलपंप परिसरात दिसून येते. हा बंद अवस्थेतील पेट्रोलपंप सध्या मोबाईल कव्हरेज मिळवण्याचे विश्वसनीय ठिकाण झाला आहे. खासदार अशोक नेते यांनी मागील महिन्यात आढावा बैठकीत या भागात भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा चांगल्या पध्दतीची व नियमित द्या, असे निर्देश बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र खासदारांच्या आदेशानंतरही सेवेमध्ये कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे पेट्रोलपंपाचा आश्रय नागरिकांना घ्यावा लागत आहे.
पेट्रोलपंपावरून घेतात मोबाईलसाठी कव्हरेज!
By admin | Updated: August 24, 2015 01:26 IST