जिल्ह्यात काेराेना आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण व रॅट तपासणी करण्यात येत आहे.
धानोरा तालुक्यात बरीच गावे ही अतिदुर्गम भागात असून, दुर्गम भागातसुद्धा कोरोनाने शिरकाव केल्याचे आढळून येत आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले अति जोखमीचे व कमी जोखमीचे व्यक्ती तसेच कोराेनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचे लवकर निदान होऊन तात्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने आता तालुका आरोग्य अधिकारी धानोरातर्फे गावपातळीवर गावागावात जाऊन काेराेना रॅट तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता तालुकास्तरावर फिरते तपासणी पथक निर्माण करण्यात आले आहे. या पथकामध्ये एक वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्य कर्मचारी व एक वाहनचालक यांचा समावेश राहणार आहे.
या फिरते पथक काेविड १९ चे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, धानोरा येथे तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, नायब तहसीलदार दामोदर भगत, धनराज वाकुडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र भावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन उपलेंचवार, तालुका आरोग्य सहायक आनंद मोडक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक चौधरी, अरविंद कोडापे, सुजित राठोड, अनिल शंकावार, महेंद्र हुलके, निकेश संतोषवार, प्रमोद कोहाडकर, मंगेश घोडमारे यांनी सहकार्य केले.