जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासाेबत मुक्तिपथची बैठक झाली होती. त्यामध्ये ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्या आनुषंगाने भामरागड पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन करून अवैध दारू व तंबाखूविरोधात कारवाई करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील त्रासदायक गावांची यादी तयार करण्यात आली. पोलीस स्टेशनला अवैध दारूच्या तक्रारी १५ दिवसांत निकाली काढणे. दर महिन्याला तालुका पोलीस अधिकारी, पोलीस बिट अंमलदार, पोलीस पाटील, मुक्तिपथ तालुका संघटक यांची बैठक होणे गरजेचे आहे. ज्या गावात किंवा वाॅर्डात रेड करणे आहे, त्या गावातील पोलीसपाटलांनी अवैध दारूविक्रेत्यांची माहिती देणे. यासाठी पोलीसपाटील यांना प्रशिक्षण देणे. १८पेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे, दर दोन महिन्यांतून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन तालुक्यात आलेल्या अडचणींवर चर्चा करून निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला भामरागडचे प्रभारी अधिकारी मंगेश कराडे, पोलीस उपनिरीक्षक भोसले, तालुका संघटक केशव चव्हाण, तालुका प्रेरक आबिद शेख उपस्थित होते.
अवैध दारू, तंबाखूविक्रीवर ठेवणार नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:50 IST