सिरोंचा : तेलंगणा- महाराष्ट्राच्या सीमेवर तेलंगणा राज्यात मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाचा अंतिम करार महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात २३ आॅगस्ट रोजी मुंबई येथे केला जाणार आहे. अंतिम करार करण्यापूर्वी सिरोंचा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबतची कारवाई करावी, त्याशिवाय दोन राज्यात अंतिम करार केला जाऊ नये, अशी भूमिका आदिवासी विद्यार्थी संघाने घेतली असून विद्यमान स्थितीत होणाऱ्या कराराचा आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. या संदर्भात सिरोंचा तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन सादर करण्यात आले. यात आविसंने म्हटले आहे की, गोदावरी नदीवर पोचमपल्ली गावाजवळ मेडिगड्डा-कालेश्वर धरणाचे बांधकाम सुरू केले आहे. या सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील २१ गावांमधील शेतकऱ्यांची शेती व जमीन उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा आदिवासी विद्यार्थी संघाने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना नुकसानभरपाई देण्याबाबत कोणतीही जनसुनावणी आजपर्यंत घेण्यात आली नाही. मात्र २३ आॅगस्ट रोजी मुंबई येथील सह्यांद्री अतिथी गृहावर महाराष्ट्र व तेलंगणा शासनामध्ये अंतिम आंतरराज्यीय करार करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी, आयुक्त आणि गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सिरोंचा तहसील कार्यालयात तत्काळ जनसुनावणी घ्यावी, अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचातर्फे महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्याच्या विरोधात अनेक ठिकाणी चक्काजाम, मोर्चे, आमरण उपोषण असे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदन देतेवेळी माजी आमदार तथा आविसं सल्लागार दीपक आत्राम, तालुकाध्यक्ष बानय्या जनगम, रवी सल्लम, सडवली कुमरी, रवी बोगोेनी, श्याम बेझलवार, मारोती गानापुरपू, गादे सोमय्या, श्रीनिवास गंटा, बापू सडमेक, मदनखा दुर्गम, विजय रेपालवार, चौधरी समय्या, अजय आत्राम, नारायण मुडीमाडीगेला, रामानंद मारगोणी, लक्ष्मण बोल्ले, सुरेश येरकारी, मलय्या सोन्नारी, अशोक कावरे, कोठा व्यंकन्ना, सडवली जनगाम यांच्यासह आविसंचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
मेडिगड्डा प्रकल्पाच्या अंतिम कराराला आविसंचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2016 01:26 IST