आमदारांना निवेदन : आरोग्यसेवा ठप्प पडणारदेसाईगंज : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतन मिळते. त्याचबरोबर सदर वेतन नियमितपणे मिळत नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. ग्रामीण रुग्णालयात २०१२ पासून सुरक्षा रक्षक, सफाईगार, वाहनचालक कंत्राटी स्वरूपात काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांकडून केवळ मासिक २ हजार ५०० रूपये मानधन दिले जाते. तुटपुंजे मानधन मिळत असताना देखील कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मागील सहा महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना नियमितपणे मानधन दिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. शासनाने किमान वेतन कायदा केला असला तरी किमान वेतनसुद्धा या कर्मचाऱ्यांना दिला जात नाही. २ हजार ५०० रूपयात महिन्याचा खर्च भागविणे अशक्य होत चालले आहे. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून अनेकवेळा कंत्राटदाराकडे केली. मात्र कंत्राटदार मजुरी वाढवून देण्यास तयार नाही. आरोग्य विभागाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली आहे. मात्र आरोग्य विभागाचे अधिकारीही याकडे लक्ष देत नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदारांना निवेदन देऊन मानधनात वाढ न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदर कर्मचारी कंत्राटी असले तरी रुग्णालयाचा कारभार सांभाळण्यात या कर्मचाऱ्यांचा मोलाचा हात आहे. या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्था ढासळण्याची शक्यता आहे. किमान मजुरीचे उल्लंघन कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सदर कंत्राटदाराची चौकशी करावी. चौकशी नंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारासुद्धा आमदारांना दिलेल्या निवेदनातून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Updated: September 12, 2015 01:24 IST