पाच किमीचा होत आहे फेरा : अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन अहेरी : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या येंकापल्ली जवळच्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. येंकापल्लीजवळ गावाजवळ असलेल्या नाल्यावर पूल बांधकामासाठी २००९ साली मंजुरी मिळाली. तत्कालीन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या पुलाचा शिलान्यास करण्यात आले. त्यांच्यानंतर दीपक आत्राम हे आमदार म्हणून निवडून आले. मात्र त्यांच्या कारकीर्दीत या पुलासाठी निधी प्राप्त झाला नाही. सतत पाच वर्ष गावकऱ्यांनी मागणी रेटून धरली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. येंकापल्ली येथील नागरिकांना शिक्षण व कार्यालयीन कामासाठी नेहमीच अहेरी व वांगपेल्ली येथे यावे लागते. मात्र नाल्यावर पूल नसल्याने एक किमीचे अंतर पाच किमी होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात पुलावरून पाणी राहत असल्याने अनेक दिवस मार्ग बंद राहते. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम या गंभीर मागणीकडे लक्ष देतील या आशेने गावकऱ्यांनी त्यांना निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी सरपंच मदना आलाम, उपसरपंच यमनुरवार, प्रकाश गलबले, नरेंद्र मडावी, विनोद तुमराम, रवींद्र आलाम, विस्तारी तलांडे, ताराबाई गलबले, दिलीप सिडाम, आलाम उपस्थित होते.
येंकापल्ली पुलाचे बांधकाम रखडले
By admin | Updated: November 18, 2015 01:42 IST