गडचिरोली : शहराजवळ असलेल्या कठाणी नदी पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली असून एका पिलरचे खोदकामही पूर्ण झाले आहे. सदर पूल २४४ मीटर लांब व ११ मीटर उंचीचा राहणार असल्याची माहिती पूल बांधकाम पर्यवेक्षकाने दिली. कठाणी नदीवर असलेले कमी उंचीचे पूल ही गडचिरोलीवासीयांसाठी डोकेदुखी ठरली होती. जनतेच्या सततच्या रेट्यानंतर शासनाने पूल बांधकामास मंजुरी दिली. दोन महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून पुलाचे दोनदा माती परीक्षण करण्यात आले होते. माती परीक्षणानंतर बरेच दिवस बांधकामाला सुरूवात न झाल्याने नागरिकांच्या मनामध्ये शंकेचे काहूर उटायला लागले होते. आता मात्र ही शंका पूर्णपणे मिटली असून प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. आजपर्यंत एका पिलरचे खोदकाम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या पिलरचे खोदकाम जेसीबी मशीनच्या सहाय्याने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण पिलरचे खोदकाम व बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यांमध्ये नदीला पाणी राहत असल्याने या कालावधीत बांधकाम बंद राहते. पिलरच्या बांधकामाबरोबरच याच वर्षी दोन्ही बाजुने रोडभरणीचे काम केले जाणार आहे. यावर्षी पुलाच्या उंचीपर्यंत माती व मुरूम टाकले जाणार आहे. सदर माती व मुरूम पावसाच्या पाण्याने दबल्यानंतर पुढील वर्षी त्यावर डांबरीकरण केले जाणार आहे. पूल बांधकामाचे बहुतांश काम मशीनच्या सहाय्याने केले जात असल्याने बांधकाम गतीने होण्यास मदत होते. एवढ्याच लांबीचे पूल दोन वर्षांत पूर्ण होऊन ते संबंधित विभागाकडे हस्तांतरीत केले आहे. त्यामुळे हे पुलही पुढच्या पावसाळ्यापूर्वी पर्यंत नागरिकांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती बांधकाम पर्यवेक्षकाने दिली. बांधकाम सुरू झाल्याने शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले असून शक्य तेवढे लवकर बांधकाम पूर्ण करण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
कठाणी नदी पुलाचे बांधकाम सुरू
By admin | Updated: March 16, 2015 01:15 IST