पत्रकार परिषद : उद्धवराव तोंडफोडे यांचा खुलासानवरगाव : शासनाच्या अटी-शर्तीची पुर्तता करूनच सिंचन विहिरीचे बांधकाम केले असून आपल्यावर लावलेले आरोप राजकीय द्वेषातून करण्यात आले आहेत. आपली उपसरपंचपदी निवड झाल्याने मला बदनाम करण्याचा डाव असल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत उद्धवराव तोंडफोडे यांनी केला.माहिती देताना ते म्हणाले, सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायतच्या रोहयोंतर्गत ग्रामसभेमधून सिंचन विहीर बांधकामासाठी आपली निवड झाली. त्यामुळे शासनाच्या अटी व शर्तीनुसार संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केली असून त्यातील ०.६० आर. जागेच्या अटीनुसार माझ्याकडे गट नं. २८ मध्ये ५२ आर, गट नं. २६ मध्ये २८ आर व गट नं. २२ मध्ये २० आर. जागा सलग असून केवळ ५२ आर. जागा उपलब्ध असल्याचा आरोप तत्कालीन उपसरपंच जितेंद्र बोरकर व सहकाऱ्यांनी केला होता. परंतु हा आरोप कुठलीही शहानिशा न करता केला होता. सिंचन विहिरीच्या बांधकामाची एजन्सी ही ग्रामपंचायत असून विहीर मंजुर व बांधकाम झाले, त्यावेळी जितेंद्र बोरकर हे उपसरपंच होते तर संदीप डोंगरवार हे सदस्य होते. त्यांच्याच पक्षाचे बहुमत होते. त्यावेळी त्यांनी कुठलीही हरकत घेतली नाही. उलट माझे काम रितसर होते. अटी-शर्तीची पूर्तता केली होती. ५०० रुपयाच्या मुद्रांकावर करारनामा जोडलेला होता, तसेच विहीर मंजूर झाली त्यावेळी माझे वडील जिवंत होते. मृत्यूनंतर त्यांचे मृत्युपत्रही जोडलेले असून संपूर्ण पुर्तता पूर्ण केल्यामुळेच बांधकामासाठी तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी शिफारसपत्र पंचायत समितीला पाठवले होते. तसेच सिंचन विहिरीसाठी ‘वर्क आॅर्डर’ची गरज नव्हती. काम सुरू झाल्यानंतर मजुराची यादी ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर लावलेली नाही, ही यादी मी स्वत: लावणार का, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेला पंचायत समिती उपसभापती रमाकांत लोधे, सरपंच सदाशिवराव मेश्राम, ग्रा.पं. सदस्य मोरेश्वर पर्वते, गजानन मेश्राम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
अटी-शर्तीची पूर्तता करूनच सिंचन विहिरीचे बांधकाम
By admin | Updated: October 7, 2015 02:07 IST