मामा तलाव दुरूस्तीलाही मान्यता : जि. प. अध्यक्षांची माहिती अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी उपविभागात एकही सिंचन प्रकल्प नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अहेरी उपविभागात बंधारे बांधकाम व मामा तलाव दुरूस्ती कामाला मंजुरी मिळवून दिली. या कामांमुळे या भागात सिंचन क्षमता वाढीला मदत होणार असल्याचे कुत्तरमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या माध्यमातून बंधारे बांधकाम, मामा तलाव दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या उपविभागात भामरागड तालुक्यात टेकला, कुमरगुडा, कोसपुंडी, पिटेकसा, मुलचेरा तालुक्यातील गिताली, बोलेपल्ली, विवेकानंदपूर, अहेरी तालुक्यातील बोरी, येदरंगा, दोडगीर, सिंदा, सिरोंचा तालुक्यातील बेजूरपल्ली, जार्ज पेढा, रोमपल्ली, कुरखेडा तालुक्यातील पलसगड, लेंढारी, वाळवी, खरखाडी, लवारी, साधूटोला, वडेगाव, गेवर्धा व धानोरा तालुक्यातील सोडे येथील साठवण बंधाऱ्याचा समावेश आहे. मामा तलाव दुरूस्तीमध्ये गडचिरोली तालुक्यात कुपी, पारडी, चामोर्शी तालुक्यातील येडानूर, माल्लेर, मारोडा या मामा तलाव दुरूस्तीचा समावेश आहे. याशिवाय अनेक ठिकाणी नहर बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश जि. प. अध्यक्ष कुत्तरमारे यांनी दिले आहे. एकूणच अहेरी उपविभागासह कुरखेडा, धानोरा या भागालाही या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. (प्रतिनिधी) १९८० वन कायद्यामुळे सिंचन प्रकल्प मंजूर करण्याच्या कामात अडचणी आहेत. त्यामुळे शेती सिंचनाची टक्केवारी वाढविण्यासाठी बंधारे उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारा बांधकामावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार अहेरी उपविभाग तसेच कुरखेडा, धानोरा तालुक्यातही अनेक ठिकाणी बंधाऱ्याचे काम मंजूर करण्यात आले. या कामांमुळे आगामी काळात सिंचन क्षमता वाढण्यास मोठी मदत होईल. - प्रशांत कुत्तरमारे, अध्यक्ष, जिल्हा परिषद गडचिरोली
अहेरी उपविभागात बंधाऱ्यांचे बांधकाम होणार
By admin | Updated: August 4, 2016 01:35 IST