गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र वर्षभरात या सरकारने लोकहिताची कामे न केल्याने काँग्रेस पक्षाने आज गडचिरोली, धानोरा व अन्य ठिकाणी मोदी सरकारच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी केली.गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावून पुण्यतिथी साजरी केली. त्यानंतर सरकारविरोधात निषेध सभा घेण्यात आली. या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम, काँग्रेसचे प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, ज्येष्ठ नेते नामदेवराव गडपल्लीवार, वसंत कुळसंगे, अमिता लोणारकर, जिल्हा परिषद सदस्य केसरी उसेंडी, शंकरराव सालोटकर, सुनील वडेट्टीवार, नरेंद्र डोंगरे, महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, नामदेव उडाण, पांडुरंग घोटेकर, नंदू वाईलकर, आकाश बघेले, लता ढोक, प्रेमिला जुमनाके, प्रेमिला मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. महागाई वाढली, शेतमालाला भाव दिला नाही, बेरोजगारांना रोजगार दिला नाही. भूमी अधिग्रहण कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगपतींना देण्याचा डाव सुरु आहे, यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. निवडणुकीपूर्वी ‘अच्छे दिन’ आणू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु लोकांना बुरे दिन पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत हे सरकार लोकहिताची कामे करण्यात अपयशी ठरले, त्यामुळे आम्ही सरकारच्या अच्छे दिनची पुण्यतिथी साजरी करीत आहोत, असे काँग्रेस नेत्यांनी यावेळी सांगितले.विकासाचा केवळ आभास-उसेंडी‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन एक वर्षापूर्वी सत्तेत आलेले मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. मात्र केवळ विकास झाल्याचा आभास निर्माण करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी झाल्या आहे, त्या तुलनेत दर कमी करण्यात आले नाही. जीवनावश्यक वस्तुंचे भाव जैसे थेच आहेत. मेक इन इंडियामध्ये गुंतवणूक झाली नाही. औषधे महाग झाली आहेत. प्रशासनातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी लोकपाल, माहिती आयुक्त आदी पदे भरले नाहीत. प्रत्यक्ष जनतेला अच्छे दिन नाही तर बुरे दिन आल्याची टीका केली. यावेळी माजी आ. आनंदराव गेडाम, हसनअली गिलानी, चंदू वडपल्लीवार, केशरी उसेंडी, शंकर सालोटकर, पांडुरंग घोटेकर उपस्थित होते.
मोदींच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार
By admin | Updated: May 27, 2015 01:37 IST