खासदारांचे निर्देश : वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर बैठकगडचिरोली : ५२.३६ किमी लांबीच्या वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे काम लवकर सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणाची कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक नागपूर येथे नुकतीच खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी, संजय गजपुरे, डॉ. भारत खटी, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सहायक प्रणय खुणे आदी उपस्थित होते. या बैठकीत वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम, गडचिरोली रेल्वे आरक्षण केंद्राची वेळ व नव्या रेल्वे आरक्षण केंद्राच्या मंजुरीसह गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात नव्याने मंजूर करण्यात आलेल्या विविध रेल्वे मार्गावर चर्चा करण्यात आली. आलापल्लीला रेल्वे आरक्षण केंद्र होणारखासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आलापल्ली येथे रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्याबाबत नागपूर रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केली. त्यामुळे आलापल्ली येथे आरक्षण केंद्र होणार आहे. गडचिरोली आरक्षण केंद्राची वेळ वाढणाररेल्वेचे गडचिरोली येथे नगर पालिकेच्या इमारतीत आरक्षण केंद्र आहे. या केंद्राची वेळ कमी असल्याने अनेकांना रेल्वे प्रवासाचे आरक्षण करता येत नव्हते. त्यामुळे सदर मुद्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्राची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठेवण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी मंजुरी प्रदान केली.
रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहणाची कार्यवाही महिनाभरात पूर्ण करा
By admin | Updated: April 25, 2016 01:11 IST