आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच : गौणखनिजातून ४५ कोटी ७६ लाखांचा महसूल प्रशासनाला प्राप्त दिलीप दहेलकर गडचिरोलीसन २०१६-१७ या चालू वर्षात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील गौण खनिजाच्या लीज, परमिट तसेच रेती परमिट व रॉयल्टीमधून एकूण ४५ कोटी ७६ लाख ११ हजार ८५२ रूपयांचा महसूल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात सदर गौण खनिज स्वामित्वधन वसुलीची सरासरी टक्केवारी १३८.६७ आहे. विशेष म्हणजे, शासनाने जिल्हा प्रशासनाला सन २०१६-१७ या वर्षाकरिता ३३ कोटी रूपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट दिले होते. प्रशासनाने केवळ नऊ महिन्यात सदर उद्दिष्ट पूर्ण करून उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल प्राप्त केला आहे.गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्याची संख्या मोठी असल्याने रेतीघाट मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय गिट्टी, मुरूम, माती, दगडाच्या खाणीही मोठ्या प्रमाणात आहेत. या खाणीतून गौण खनिजाचे तसेच रेतीघाटावरून रेतीचे उत्खनन करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार संबंधित कंत्राटदाराला आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन परवाना घ्यावा लागतो. त्यानंतरच सदर कंत्राटदार आपल्या विशिष्ट क्षेत्रातून गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक नियमानुसार करीत असते. गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीच्या कामासाठी संबंधित कंत्राटदाराला लीज व परमिट घ्यावा लागतो. यासाठी विविध विभागाकडून जिल्हा खनिकर्म विभागाला महसूल प्राप्त होत असतो. राज्य शासनाने सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्हा प्रशासनाला गौण खनिज स्वामित्वधन वसुलीबाबत ३३ कोटींचे सुधारित उद्दिष्ट दिले होते. १२ तालुक्यातील सहा उपविभाग मिळून आतापर्यंत एकूण ४५ कोटी ७६ लाख ११ हजार ८५२ रूपयांचा महसूूल मिळाला आहे. स्वामित्वधन वसुलीत अहेरी उपविभाग सर्वाधिक आघाडीवर आहे. या उपविभागाने एकूण ३१ कोटी ३२ लाख ९६ हजारांचा महसूल मिळविला आहे.रेती घाटापासून ३३ कोटी ७५ लाख मिळालेरेतीघाट परवान्यातून संबंधित डिलर व कंत्राटदाराकडून एप्रिल ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला एकूण ३३ कोटी ७५ लाख ९३ हजार ७०२ रूपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये देसाईगंज तालुक्यातून २ कोटी २१ लाख, आरमोरी तालुक्यातून १ कोटी २९ लाख ६६ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दोन्ही तालुके मिळून देसाईगंज उपविभागातून एकूण ३ कोटी ५१ लाख ३७ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गडचिरोली उपविभागात रेती घाटापासून १ कोटी ६५ लाख ६९ हजार, चामोर्शी उपविभागातून ४२ लाख, कुरखेडा उपविभागातून २१ लाख ९९ हजार, अहेरी उपविभागातून २७ कोटी ९४ लाख ८३ हजार रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, अहेरी उपविभागात रेती घाटापासून सर्वाधिक महसूल मिळाला आहे. एटापल्ली व भामरागड तालुक्याचा समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागाला रेती घाटापासून एकही रूपयाचा महसूल प्राप्त झाला नाही.
स्वामित्वधन वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2017 01:00 IST