पुलाचे काम प्रगतीवर : वैरागड-मानापूर मार्गावरील वाहतूक होणार सुरळीत लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी गडचिरोली मार्फत वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवरील पुलाचे काम फेब्रुवारी २०१७ मध्ये सुरू करण्यात आले. पावसाळ्यापूर्वी सदर नदीपात्रात २० खांब उभारण्यात आले असून अधिक मनुष्यबळ व यंत्राचा वापर या कामात होत आहे. परिणामी सदर पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षाच्या पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम १०० टक्के पूर्ण होऊन वैरागड-मानापूर हा पावसाळ्यातही वाहतुकीसाठी मोकळा होणार आहे. वैरागड जवळून वाहणाऱ्या वैलोचना नदीवर कमी उंचीचा पूल असल्याने पावसाळ्यात हा पूल डोकेदुखी ठरत होता. गतवर्षी या पुलावरून पाणी वाहत असताना तब्बल नऊ वेळा वाहतूक बंद झाली होती. ऐन शेतीच्या हंगामात नदीपलीकडील शेतकऱ्यांचे काम चार-चार दिवस बंद राहत होते. आता कंत्राटदारामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने या पुलाचे काम गतीने सुरू आहे. पुलाचे बांधकाम झाल्यास नागरिकांमध्ये सोयीचे होणार आहे.
वैलोचना नदीवरील २० पिलरचे काम पूर्ण
By admin | Updated: June 24, 2017 01:28 IST