एटापल्लीच्या वाॅर्ड क्रमांक ७ मध्ये चुने चिंचेचे झाड आहे. या झाडापासून नागरिकांना धाेका असल्याने ते बुडापासून ताेडण्याची मागणी मागील पाच वर्षांपासून केली जात आहे. ८ डिसेंबर २०१५ पासून दरवर्षी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले जात आहे. यावर्षी दिलेले हे पाचवे निवेदन आहे; परंतु सदर झाड तोडण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष हाेत आहे. याबाबत नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी श्रीराम डाके यांना विचारले असता, झाड मोठ्या अडचणीच्या जागी असल्याने ते तोडण्यास कुणीच तयार होत नाही, असे सांगितले. पावसाळ्यात वादळाने हे जुने झाड काेसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील लाेकांच्या घरांवर झाड काेसळल्यास जीवित व वित्तहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने झाडाची लवकर विल्हेवाट लावावी, अन्यथा झाड पडून घरांचे किंवा इतर हानीस नगरपंचायत जबाबदार राहील, असे वाॅर्डातील गिरजाबाई मेव्रतवार, जनाबाई दुर्वा, सुरेखा हिचामी, जयश्री झुरी, नीरजा मेश्राम, सुमन मेश्राम, छाया जेट्टी, बंडू गावडे, संगीता पुडो, राजू मडावी, अनुसया बावने यांनी नगरपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बाॅक्स
नगरपंचायतीच्या उलट्या बाेंबा
एटापल्ली शहरातील वाॅर्ड क्रमांक ७ मध्ये असलेले धाेकादायक चिंचेचे माेठे झाड ताेडण्याची मागणी वाॅर्डातील नागरिक गेल्या पाच वर्षांपासून करीत आहेत. यावर्षीसुद्धा नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन झाड ताेडण्याची मागणी केली; परंतु नागरिकांच्या मागणीला प्रशासनाने उलट समजून तक्रारदारांनाच नाेटीस पाठवून बजावले. पावसाळा असल्याने सदर वाॅर्डातील झाड तुम्ही स्वत: ताेडा, अन्यथा झाड पडून दुर्घटना घडल्यास तुम्हीच जबाबदार असणार, असे म्हटले आहे. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे नगरपंचायतचे कर्तव्य आहे; परंतु प्रशासन उलट नागरिकांनाच धारेवर धरून जबाबदारी स्वीकारण्यास बाध्य करत आहे. या माध्यमातून प्रशासनाच्या उलट्या बाेंबा दिसून येत आहेत, असेही नागरिकांनी म्हटले आहे.