आयुक्तांना चौकशीसाठी लिहिले पत्र : नगरसेविकेची होती तक्रारगडचिरोली : भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या देसाईगंज नगरपालिकेतील रस्ता दुभाजक विद्युतीकरण कामासंदर्भात झालेल्या निविदा प्रक्रियेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका कल्पना अशोक माडावार यांनी तक्रार खा. अशोक नेते यांच्यासह आयुक्तांकडेही केली होती. आपल्याच पक्षाची सत्ता असलेल्या नगर परिषदेच्या विरोधातील तक्रारीची दखल घेऊन खा. अशोक नेते यांनी खऱ्या अर्थाने नि:स्पृह लोकप्रतिनिधी कसा असावा, हे दाखवून दिले आहे.त्यांनी या तक्रारीची दखल घेत, यासंदर्भात २४ जून २०१५ ला विभागीय आयुक्तांना या प्रकरणाची लक्ष घालून चौकशी करा, असे सुचविले आहे. नेते या भूमिकेबद्दल जिल्ह्यात अत्यंत चांगली प्रतिक्रिया उमटली आहे. भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचार विरहित प्रशासनाच्या नावावर सत्ता मिळविली व ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा देत कामालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाच्या खासदारांकडे विविध पक्षांचे लोक तक्रारी घेऊन येतात. त्या सर्वांच्या तक्रारींची दखल घेण्याची भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून अशोक नेते यांनी घेतली, हे यावरून दिसून येत आहे. नगरसेविका कल्पना अशोक माडावार यांनी खा. अशोक नेते यांच्यासह आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी ब्रह्मपुरी व लाखांदूर मार्गावर दुभाजक व त्यावर विद्युतीकरण कामाचा ठराव मंजूर करण्यात आला. इतकेच नव्हे दोन-तीन दिवसांमध्ये लगबगीने ६४ लाख ७२ हजार ५६५ रूपयांचे देयक कंत्राटदाराला प्रदान करण्यात आले. या प्रकरणाची ही तक्रार होती.देसाईगंज पालिकेविरोधातील तक्रारीची दखल नेते यांनी घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आयुक्तांना सुचविले आहे. त्यामुळे जिल्हाभर या प्रकरणाची सध्या चर्चा आहे. अशोक नेते यांच्या भूमिकेचेही भाजपच्या वर्तुळातून चांगले स्वागत झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
खासदारांकडून तक्रारीची दखल
By admin | Updated: July 2, 2015 02:12 IST