देसाईगंज : स्थानिक भाजपा नेते आकाश व रोहित श्रीकृष्ण अग्रवाल यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक २०१४ ला निवडणूक खर्चाची मागणी करून अद्याप रक्कम परत न केल्याची तक्रार सागर डेंगानी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली. तक्रारीत रक्कमेची मागणी केल्यावर अश्लिल शिवीगाळ केल्याचे नमूद केले आहे. आकाश अग्रवाल हे भाजपच्या गडचिरोली जिल्हा उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक २०१४ ला निवडणुकीकरिता सागर डेंगानी यांच्याकडून रक्कम परतीच्या वेळी दुप्पट रक्कम देण्याच्या नावावर दोन लाख रुपये घेतले. निवडणुकीनंतर रक्कम परत मिळविण्याकरिता सागर डेंगानी यांनी आकाश व रोहित अग्रवाल यांच्याकडे वारंवार रक्कम परत मागण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधितांकडून प्रत्येक वेळी टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली. गैर अर्जदारांनी ७ मार्च २०१६ ला दुपारी २.३० वाजता सागर डेंगानी यांना त्याच्या दुकानात बोलाविले. त्यावेळी गैरअर्जदाराचे वडील, भाऊ यांनी मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच सिंधी समाजाविषयी अर्वाच्च शिवीगाळ करून मी तुला रक्कम देणार नाही. तुला जे जमेल ते करून घेण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर त्यानी माझ्याविरूध्द तक्रार पोलिसात दाखल केली. सागर रमेशलाल डेंगाणी यांचा शहरात छोटासा व्यवसाय आहे. तुटपूंज्या व्यवसायावर त्याचा कुटुंब चालतो. रक्कम दुप्पट मिळण्याच्या लोभापायी मी स्वकष्टाची रक्कम दलालांच्या हातात दिली. माझी मागितलेली रक्कम मला परत मिळावी म्हणून सागर डेंगानी यांनी तक्रार दाखल केली आहे. संबंधित प्रकरणाची योग्य तपासणी करून संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांनी तक्रारकर्त्याला दिले आहे. (वार्ताहर)
अग्रवाल बंधूविरोधात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार
By admin | Updated: April 16, 2016 01:03 IST