बोगस बदल्यांचे प्रकरण : शिक्षक आमदाराचे जिल्हा परिषद प्रशासनाला निर्देशगडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत मे २०१३ नंतर करण्यात आलेल्या २२० शिक्षकांच्या बदल्या बनावट आदेश पत्रांवर करण्यात आले आहे. हे शासनाने केलेल्या चौकशी अहवालातूनही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या विरोधात सात दिवसांच्या आत पोलिसांकडे फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करा, असे निर्देश गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखांना नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद सदस्य ना. गो. गाणार यांनी शुक्रवारी दिले. गडचिरोली जिल्हा परिषदेत त्यांनी शिक्षकाच्या विविध समस्यसंदर्भात आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी सदर निर्देश दिले. या बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, जिल्हा कार्यवाह प्रमोद खांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत शेंडे, एस. पी. मेश्राम, विभागीय सहकार्यवाह सत्यम चकीनारप, नत्थुजी पाटील, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कोमरेवार, जिल्हा कार्यवाह रमेश बोरकर, विभाग कोषाध्यक्ष कवडूजी पेंदोर, सुनिल पनकंटीवार, लालाजी कावळे, परशुराम चोपडे, राजू आत्राम, भास्कर मडावी, रितेश हाडगे, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, मधुकर रापर्तीवार, निलेश विश्रोजवार आदी उपस्थित होते. या बैठकीत आमदार गाणार यांनी बोगस बदल्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आपण पावसाळी अधिवेशनात मागणी करणार असल्याचे सांगितले. भविष्य निर्वाह निधी रक्कम शिक्षक व कर्मचाऱ्यांना तत्काळ मिळण्याबाबत कारवाई करा, मय्यत सेवानिवृत्त शिक्षकांच्या कुटुंबियांना तत्काळ पेन्शन देण्याबाबत प्रशासनाने सतर्कतेने काम करावे, तसेच अप्रशिक्षीत शिक्षण सेवकांना न्यायालयीन आदेशानुसार नियमित वेतनश्रेणी व वेतनवाढ थकबाकी काढण्याबाबत कारवाई करण्यात यावी, जि.प.च्या शिक्षण समितीवर शिक्षक संघटनांचा प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबत कारवाई करा, शिक्षकांकडे असलेले शाळा बांधकामाचे काम तत्काळ काढून घेण्यात यावे, शिक्षकांना दर महिन्याच्या १ तारखेला वेतन देण्यात यावे, शौचालय बांधकाम प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशी अहवालानुसार दोषी अभियंता व गट शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, आदी मुद्यांवर या आढावा बैठकीत शिक्षक आमदार गाणार यांनीआढावा घेतला.(प्रतिनिधी)
सात दिवसांत पोलिसांत तक्रार द्या
By admin | Updated: June 13, 2015 01:46 IST