देसाईगंज : शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येकजण आपल्या वाहनात काही वेगळे असावे याकडे लक्ष देतो़ मात्र या वेगळेपणाच्या मानसिकतेमुळे वाहनांमध्ये अधिक तिव्रतेचे हेडलाईट लावणे सुरू झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे़ वाहनांना डोळे दिपवणारे पांढरे हेडलाईट लावणे इतरांसाठी जीवघेणे ठरत आहेत़ रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या वाहनांचे पांढरे हेडलाईट डोळ्यावर पडल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ सर्रास चालणाऱ्या या वाहनांवर मात्र आतापर्यंत तरी कोणतीही कारवाई केलेली नाही. शहरात दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते़ अन्य शहरातील अनेक वाहनाने त्यात असतात़ रात्र होताच या वाहनांच्या पांढऱ्या शुभ्र हेड लाईटमुळे समोरच्या वाहन चालकांना काहीच दिसत नाही़ हेडलाईटची तिव्रता इतकी जास्त असते की, वृध्द वाहनचालकांना तर जागीच थांबावे लागते़ या तीव्र प्रकाशामुळे लहानमोठ्या अपघाताचे प्रमाण शहरात वाढले आहे़ शुभ्र प्रकाशझोत असलेली बहुतांश वाहने बाहेरगावची असल्यामुळे त्यांना पकडणेही सहज शक्य होत नाही़हजारो वाहनांमध्ये आपले वाहन वेगळे दिसावे या अपेक्षेने तरूणांना झपाटले आहे़ त्यामुळेच तरूण वाहन चालक वाहनांवर प्रयोग करून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत़ या प्रयोगातूनच वाहनांच्या हेडलाईटमध्ये पांढरा शुभ्र लाईट लावून समोरच्यांना दिपविण्याची स्पर्धा तरूणाची चालविली आहे़ वाहनाना त्या कंपनीने दिलेल्या प्रकाशापेक्षा जास्त व्होल्टेजचे बल्ब लावण्याची परवानगी कोणतेही परिवहन कार्यालय देत नाही़ मात्र मेकॅनिकला हाताशी पकडून तरूण वाहन चालक सर्रास अशा प्रकारचे बल्ब लावणे सुरू केले आहे़ अशा वाहनांवर अजूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही वाहतूक पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही़ त्यामुळे फोकस लाईटचा वापर अधिक होत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
वाहनांमध्ये फोकस लाईटचा सर्रास वापर; अपघातही वाढतीवर
By admin | Updated: January 31, 2015 01:39 IST