यशस्वी प्रात्यक्षिक : जि. प. कृषी विभागाची माहिती; ट्रॅक्टरच्या तुलनेत कमी खर्चगडचिरोली : १२ अश्वशक्ती असलेल्या पॉवर टिलरवर भात मळणी यंत्र चालविण्याचा प्रात्यक्षिक कृषी विभागाच्या मार्फतीने साखरा येथे करण्यात आला. सदर प्रात्यक्षिक यशस्वी झाला आहे. त्यामुळे मळणी यंत्र आता पॉवर टिलरवर चालविता येईल, असा आशावाद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मानव विकास मिशन, जिल्हा वार्षिक योजना व आदिवासी उपयोजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणांतर्गत शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना अनुदानावर कृषी साहित्याचे वितरण करण्यात आले. या योजनेंतर्गत जिल्हाभरातील ८७ शेतकरी गटांना पॉवर टिलरचे वितरण करण्यात आले आहे. पॉवर टिलर हे बहुपयोगी यंत्र आहे. मात्र या यंत्राचा उपयोग गडचिरोली जिल्ह्यात केवळ चिखलणीपुरताच केला जात होता. धानाची पीक निघाल्यानंतर उर्वरित आठ महिने सदर यंत्र पडून राहत होते. पॉवर टिलरवर मळणी यंत्र चालविता आले तर पॉवर टिलरला काम मिळून संबंधित शेतकरी गटाला थोडेफार अधिकचे उत्पन्न मिळेल, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने साखरा येथे प्रात्यक्षिक केले. या प्रात्यक्षिकादरम्यान पॉवर टिलरवर मळणी यंत्र अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आता मळणी यंत्र चालविण्यासाठी पॉवर टिलरचा वापर करू शकतात. प्रात्यक्षिकाच्या वेळी कृषी विकास अधिकारी संजय सूर्यवंशी, जिल्हा कृषी अधिकारी शेरान पठाण, कृषी विस्तार अधिकारी कृष्णा दोनाडकर, दीपक जंगले, मनीषा राजनहिरे, पवन मादमशेट्टीवार, नामदेव उंदीरवाडे, हेमंत उंदीरवाडे, जनार्धन साखरे उपस्थित होते.
पॉवर टिलरवर चालणार मळणी यंत्र
By admin | Updated: October 21, 2015 01:34 IST