चामोर्शीत कार्यशाळा : दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्याचे संवर्ग विकास अधिकाऱ्यांचे आश्वासनचामोर्शी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा चामोर्शी यांची सभा स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात गुरूवारी सभापती शशिकला चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी, गटशिक्षणाधिकारी सहारे, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक देवतळे, अधीक्षक कागदेलवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत वेतनप्रणाली सुरळीत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेत, शिक्षकांचे दरमहा वेतन १ तारखेच्या आत अदा करणे, बदलून आलेल्या शिक्षकांचे थकीत वेतन, वेतनासोबत अदा करणे, चटोपाध्याय समितीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविणे, शिक्षक संघटनांची द्विमासिक सभा नियमित घेणे, उन्हाळ्यात मतदार याद्यांचे काम करणाऱ्या शिक्षकांची नोंद सेवा पुस्तकात करणे, पोषण आहार देयके अदा करणे, शिक्षकांची उच्च शैक्षणिक अर्हता सेवा पुस्तकात नोंदविणे, मुलींचा दैनिक उपस्थिती भत्ता, देयके अदा करणे, अप्रशिक्षित शिक्षणसेवकांची तीन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना वेतन श्रेणी लावून थकबाकी काढणे, शाळा, देखभाल व शाळा अनुदान त्वरित देणे यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांची वेतनप्रणाली सुरळीत होण्याकरिता दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्याची मागणी संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी मान्य केली. तसेच इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सभेत महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे विभागीय उपाध्यक्ष नथ्यूजी पाटील, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष कोमेरवार, प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, चामोर्शी शाखेचे अध्यक्ष नीलेश खोब्रागडे, कार्यवाह देवीदास गणवीर, उपाध्यक्ष एच. यू. गेडाम, उपाध्यक्ष उद्धव केंद्रे, तालुका संघटन मंत्री डी. जी. चौधरी, विकास चव्हाण, श्याम मेश्राम, जी. बी. सिरसाट व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
वेतनप्रणाली सुरळीत करण्यावर मंथन
By admin | Updated: November 7, 2015 01:24 IST