नागरिकांना दिलासा : खासदारांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजनगडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगाव-खुर्सा-रांगी या सात किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले असून खा. अशोक नेते यांच्या हस्ते विधीवत पूजन करून या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, खुर्साच्या सरपंचा मंजुळा पदा, भाजयुमोचे योगेश मुत्तेलवार आदी उपस्थित होते. चातगाव-खुर्सा-रांगी या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. सदर मार्ग पूर्णत: उखडल्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. या मार्गाचे पोर डांबरीकरण करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून सातत्याने होत होती. अखेर खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून चातगाव-रांगी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर करून घेतले. या कामासाठी निधीची तरतूद झाल्याने या मार्गाच्या कामाचे रितसर भूमिपूजन करण्यात आले. या कामाची गुणवत्ता चांगली ठेवून सदर रस्त्याचे काम विहीत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश खा. अशोक नेते यांनी संबंधित अभियंत्यांना यावेळी दिले. गेल्या अनेक दिवसांपासून चातगाव-खुर्सा-रांगी रस्ता पूर्णत: उखडल्याने या मार्गावर अनेक अपघातही घडले होते. बससेवा प्रभावीत होत होती. अखेर डांबरीकरणाचे काम मंजूर झाल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
चातगाव-खुर्सा-रांगी मार्गाचे डांबरीकरण होणार
By admin | Updated: January 17, 2016 01:20 IST