अपघात वाढले : वाहतुकीसही होत आहे अडथळाचामोर्शी : मागील काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांचा प्रचंड हैदोस वाढला असून या जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे संबंधित प्रशासनाने दुर्र्लक्ष होत आहे. चामोर्शी शहरातील बसस्थानकाचा परिसर, लक्ष्मी गेट व गडचिरोली मार्ग ही नेहमी वर्दळ राहत असलेली ठिकाणे आहेत. मात्र नेमक्या याच ठिकाणावर मोकाट बैल, गाय, म्हैस, बकऱ्या आदींचा वावर असल्याचे दिसून येते. चामोर्शी हा जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने या शहरातून नेहमी जड वाहने व प्रवासी वाहनांची ये-जा सुरू राहते. छत्तीसगडवरून येणारी वाहने रात्रीही ये-जा करतात. मात्र मोकाट जनावरे या मुख्य मार्गावर बसून राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास अपघात होऊन अनेक मोकाट जनावरांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे. मात्र सदर प्रशासन ही समस्या फार गंभीरतेने घेत नसल्याने दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा हैदोस वाढत चालला आहे. या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. (शहर प्रतिनिधी)
चामोर्शीत मोकाट जनावरांचा हैदोस
By admin | Updated: August 28, 2015 00:19 IST