जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या बाबींमधील किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळ विक्रेते, दूध पुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, पशुखाद्य दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, मासे, अंडी इ.), कृषी संबंधित दुकाने, पावसाळ्याकरिता लागणारे साहित्य व इतर सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये सकाळी ७ ते ११ असे केवळ ४ तास सुरू ठेवण्याची अनुमती राहणार आहे.
जिल्ह्यातील सर्व बँकांची ग्राहक सेवा व व्यवहार सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्य सेवा, रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स इत्यादींना सदर वेळेचे बंधन लागू राहणार नाही. या वेळेशिवाय वैध कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला ये-जा करता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत औषधे घेण्याकरिता जायचे असल्यास सोबत वैध औषधोपचार चिठ्ठी ठेवणे आवश्यक राहील. या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती, संस्था, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र राहणार आहे. हा आदेश १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अमलात राहणार आहे.
भाजी विक्रेत्यांची तारांबळ, डिपार्टमेंटल स्टोअरला सूट?
जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १९ ला काढलेल्या आदेशात किराणा, भाजीपाला विक्रीची दुकाने ३ पर्यंत सुरू राहतील, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवार दि.२० ला गुजरी येथील भाजीबाजारात २.४५ वाजेपासूनच भाजीपाला विक्रीची दुकाने गुंडाळण्यात आली. नगर परिषदेचे काही कर्मचारीही तिथे हजर होते. त्यामुळे भाजी विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पण याच गुजरी बाजाराबाहेरील मुख्य मार्गावर दुर्गा मंदिरालगत असलेले एक डिपार्टमेंटल स्टोअर दुपारी ४.१५ वाजले तरी उघडेच होते. मोठ्या दुकानदारांना कारवाईतून सूट मिळते का, असा प्रश्न अनेकांना पडला होता.