सिरोंचा : खरीप हंगामात तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प पाऊस झाला. परिणामी शेकडो हेक्टर शेती धान पिकास मुकली. त्यामुळे खरीप हंगामातील भरपाई काढण्याकरिता रबी हंगामात तृणधान्य पिकाची लागवड केली. तालुक्यात १६२१ हेक्टरवर तृणधान्याची लागवड करण्यात आली. एकूण १०३ टक्के क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात धानाची पूर्ण हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली नव्हती. मात्र रबी हंगामात जिल्ह्यात तृणधान्य पिकाची १०३ टक्के क्षेत्रामध्ये पेरणी झाल्याने तृणधान्य पिकांनी शेतकऱ्यांना काही प्रमाणात साथ दिली आहे. रबी हंगामात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र पाच हजार हेक्टर आहे. त्यापैकी बाराही तालुके मिळून तीन हजार ९१८ हेक्टर क्षेत्रामध्ये रबी ज्वारीची लागवड करण्यात आली आहे. गव्हाच्या पिकांखालील सर्वसाधारण क्षेत्र १ हजार ९० हेक्टर आहे. त्यापैकी ६३९.१० हेक्टर क्षेत्रामध्ये गव्हाची पेरणी करण्यात आली आहे.रबी मका पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ५१० हेक्टर आहे. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आल्याने तब्बल दोन हजार ३९.७५ हेक्टर क्षेत्रांपर्यंत मक्याची लागवड पोहोचली. ज्वारी, गहू आणि मका तसेच इतर तृणधान्य पिके मिळून जिल्ह्यात सहा हजार ६०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ६ हजार ८०१ क्षेत्रामध्ये तृणधान्य पेरणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय विचार करता सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक १६२१ हेक्टर क्षेत्रामध्ये तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात २१०.३७ हेक्टर क्षेत्रात तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. चामोर्शी तालुक्यात ७२६ हेक्टर, धानोरा ७५१.१० हेक्टर, मुलचेरा ४०५ हेक्टर, देसाईगंज २९० हेक्टर, आरमोरी २७४ हेक्टर, कुरखेडा ४७५ हेक्टर, कोरची २७० हेक्टर, अहेरी १२४७.३० हेक्टर, एटापल्ली ३७७.६० हेक्टर, व भामरागड तालुक्यात १५३.५ हेक्टर क्षेत्रामध्ये ज्वारी, गहू, मका व इतर तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी अवकाळी पावसाचा काही प्रमाणात ज्वारी, गहू व मका तसेच अन्य तृणधान्य पिकास फटका बसला आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात ज्वारी पिकाखालील क्षेत्रामध्ये घट होत आहे. केवळ जिल्ह्याच्या दक्षिण भागात सिरोंचा तालुक्यात ज्वारी पिकाची लागवड जास्त प्रमाणात होताना दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
१६०० हेक्टरवर तृणधान्याची लागवड
By admin | Updated: April 18, 2015 01:41 IST