लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे.
तलावाचे सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे.
औषधांचे बिल न देणाऱ्यांवर कारवाई करा
देसाईगंज : गडचिरोली शहरातील बहुतांश औषधविक्रेते ओरिजनल बिल ग्राहकाला देत नाही. १० गोळ्यांच्या प्रत्येक स्ट्रिपवर किंमत लिहून राहते. मात्र, ग्राहकाने पाच ते सहा गोळ्या खरेदी केल्यास त्यासाठी किती किंमत आकारली जाते, याचा थांगपत्ता नाही.
सिरोंचा भागात अवैध वृक्षतोड सुरूच
भामरागड : तालुक्यात जंगलातून मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून तेलंगणा राज्यात तस्करी केली जाते. विशेष म्हणजे, वन कर्मचाऱ्यांनी अनेकदा तस्कारांवर कारवाई केली आहे, परंतु रात्रीच्या सुमारास ही तस्करी होत आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
भामरागड : ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. कियर, बेजूरसह अन्य गावांतील सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास गावात अंधार राहताे.
नूतनीकरणाची प्रतीक्षा
अहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा-ताडगाव पर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच रस्ता उखडला असल्याची ओरड परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.
कुटुंब नियोजनाची गरज
मुलचेरा : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजना महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृतीची गरज आहे. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत गैरसमज आहे.
जळाऊ लाकडाचा तुटवडा
कोरची : येथे विविध विभागांचे कर्मचारी, अधिकारी वास्तव्य करतात, परंतु त्यांना वेळेवर जळाऊ लाकडे उपलब्ध होत नाही. स्थानिक नागरिकांना वन विभाग सरपणासाठी लाकूड उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होत आहे. बहुतांश डेपोंवर जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी
कुरुड : देसाईगंज तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. कोकडी, तुळशी, विसोरा, विहिरगाव आदी भागांत ही समस्या आहे. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोकाट जनावरांचा हैदोस
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहते असल्याचे दिसते.
अपघात वाढले
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर भेंडाळाच्या बस स्थानकावर गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. चामोर्शी-मूलमार्गे, तसेच आष्टीकडे जाणारी वाहने भरधाव वेगाने जातात. मात्र, या ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. माेठे गाव असतानाही बस स्थानक नसल्याने अपघात वाढले आहेत.
दुग्ध योजना राबवा
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दुधाळ जनावरांची संख्या घटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन कमी होत चालले आहे. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात ७५पेक्षा अधिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत होत्या. मात्र, त्यातील ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत.
दत्तमंदिरात सुविधा द्या
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे मंदिर आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून, मंदिर परिसरात सोयीसुविधा देण्याची मागणी होत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत आहे.
अंतर्गत रस्ते खड्डेमय
देसाईगंज : शहरातील पेट्रोल पंप ते हनुमान वाॅर्डातील साई मंदिरापर्यंत अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे पादचारी तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी अपघातदेखील घडू शकतो. त्यामुळे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.