जाेगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील नाल्यावर जून २०२०मध्ये बांधकाम केलेला सिमेंट काँक्रीटचा बंधारा एका वर्षात तुटल्यामुळे सिंचाई विभाग व कंत्राटदाराच्या बांधकाम कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण होत आहे.
जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद उपविभाग देसाईगंज या यंत्रणेकडून जून २०२० मध्ये १३ लाख रुपये खर्चातून पाथरगाेटा येथील नाल्यावर सिमेंट काँक्रीट बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाच्या साहित्याने करण्यात आले. बांधकामासाठी २० टक्के काळी गिट्टी व ८० टक्के डोंगरगाव येथील पांढरी गिट्टी वापरण्यात आली. तसेच अत्यल्प सिमेंट व लोखंडाचा वापर करण्यात आला. जवळच्या नाल्यावरील मातीमिश्रित चोरलेल्या रेतीचा वापर करण्यात आला. एक वर्षापूर्वीच बंधाऱ्याच्या भिंती तडकल्या आहेत. अनेक ठिकाणी बंधाऱ्याला भेगा पडल्या आहेत. बंधाऱ्याचे खोलीकरण न केल्यामुळे बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा कुठेच दिसून येत नाही. मग १३ लाख रुपये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बंधारा उभा करण्यात संपले काय, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडत आहे. अनेक वर्षांपासून एकाच शाखेत काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी मिळाला असल्याने या बंधाऱ्याचे बांधकाम ५० टक्के आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी असलेल्या ठिकाणी करायचे हाेते. बंधारा बांधकामाचे ठिकाण बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत, ग्रामसभेत प्रस्ताव पारित करून योग्य ठिकाणाची निवड करायची हाेती. मात्र अशी कुठलीही शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. आदिवासी प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याची जमीन नसलेल्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. विशेष म्हणजे २०० मीटर अंतरावर अगाेदरच अस्तित्वात असलेल्या दाेन बंधाऱ्यांच्या मध्ये नवीन बंधारा बांधण्यात आला. तीनही बंधारे एकाच नाल्यावर, एकाच ठिकाणी का बांधण्यात आले असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या हक्कातील योजनेच्या बंधाऱ्याची चोरी करून चुकीच्या ठिकाणी आर्थिक स्वार्थापोटी निकृष्ट दर्जाचा सिमेंट काँक्रीट बंधारा बांधला. याची सखोल चौकशी करून बिल काढणाऱ्या अधिकारी व बांधकाम कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी व इतर शेतकरी नागरिकांकडून करण्यात येत आहे.