कोरची : गावातीलच एका युवतीशी गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध प्रस्तापित करून युवतीचे शारीरिक शोषण केले. मात्र लग्नास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून पीडित युवतीने थेट कोरचीचे पोलीस ठाणे गाठून ३ मे रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कोरची पोलिसांनी लग्नाचे खोटे आमिष दाखवून शारीरिक शोषण करणाऱ्या पोलीस शिपायावर भादंविचे कलम ३७६, ४१७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नरेश जग्गुराम कल्लो (३१) रा. बोदालखंड ता. कोरची असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून तो सध्या देसाईगंज येथे क्युआरटी पथकात कार्यरत आहे. पीडित युवतीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २००३ पासून नरेश कल्लो व माझ्यात मैत्रीचे संबंध होते. एकाच गावात राहत असल्याने २००७ मध्ये मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हापासून आमच्या दोघांचे बोलणे सुरू होते. नरेशची बहीण प्रेमिला ही माझी मैत्रीण असल्याने नरेशचे माझ्या घरी जाणे-येणे वाढले. दरम्यान नरेशने मला लग्नाचे खोटे आमिष दाखवून माझ्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वडसा येथील नरेशच्या खोलीवरही आमच्या भेटीगाठी होत होत्या. मात्र नरेशकडून लग्नाला होकार मिळत नव्हता. अखेर नरेश दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याची भणक लागल्यामुळे आपली फसवणूक झाली, हे लक्षात आले. त्यामुळे आपण नरेशच्या विरोधात कोरचीच्या पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करीत असल्याचे पीडित युवतीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोरचीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. के. घाडगे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
वडसाच्या पोलीस शिपायावर बलात्काराचा गुन्हा दाखल
By admin | Updated: May 21, 2015 01:44 IST