गडचिरोली : जिल्ह्यात विविध प्रकारचे नवीन शैक्षणिक उपक्रम राबवून ते दुर्गम भागात पोहोचविणाऱ्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांचे झालेले स्थानांतरण त्वरित रद्द करावे, अशी मागणी नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी एक विद्यार्थी, एक झाड, तीन तास टी. व्ही. बंद, १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथमहोत्सव, विज्ञान प्रदर्शनी अशा विविध उपक्रमांचे आयोजन जिल्ह्यात केले. जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे त्यांचे स्थानांतरण त्वरित रद्द करावे, अन्यथा एनएसयूआयतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी स्वीकारले. निवेदन देताना एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, महासचिव गौरव अलाम, महासचिव राज सोनुले, सचिव नितेश बाळेकरमकर, महासचिव रिना टेकाम, सचिव आकाश बघेल, सुमित बारई, निखिल शेंडे व कार्यकर्ते हजर होते. (शहर प्रतिनिधी)
शिक्षणाधिकाऱ्यांचे स्थानांतरण रद्द करा
By admin | Updated: July 5, 2015 01:47 IST