भामरागड : भामरागड तालुक्यातील अनेक डांबरीकरण मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. गिट्टी उखडल्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात मार्गावर घडत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस दररोज पंक्चर होत असल्याचे दिसून येते. यामुळे बसमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान रस्त्यावरच पंक्चर झालेले बसचे चाक रस्त्यावर बदलविण्याची पाळी अनेकदा बसच्या चालकावर येत असते. यामुळे बसफेरीचे वेळापत्रकही पूर्णत: कोलमडले आहे.मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड-आलापल्ली मार्गावरील लहान खड्ड्यांचे मोठ्या खड्ड्यात रूपांतर झाले आहे. काही ठिकाणी अर्ध्यापेक्षाही जास्त रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. अतिवृष्टीमुळे पेरमिली-भामरागड-लाहेरी तसेच भामरागड-कोठी-ताडगाव-मन्नेराजाराम या मार्गाची पूर्णत: दूरवस्था झाली आहे. गेल्या वर्षभरापासून भामरागड तालुक्यातील अनेक डांबरीकरण मार्ग तसेच कच्चे रस्ते पूर्णत: उखडले आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांचे अनेकदा अपघात घडले आहे. या अपघातात काही नागरिक जखमी झाले होते. तीन दिवसापूर्वी भामरागड तालुक्यातील कोठी आश्रमशाळेचा विद्यार्थी गंभीर आजारी पडला. कोठी येथे प्राथमिक आरोग्य पथक आहे. मात्र या ठिकाणी डॉक्टर नाही. सदर आजारी विद्यार्थ्याला भामरागड तालुका मुख्यालयी उपचाराकरिता आणण्यासाठी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कोणीही खासगी वाहन द्यायला तयार होत नव्हते. त्यामुळे आश्रमशाळेचे अधीक्षक व मुख्याध्यापकांना अधिकचे पैसे देऊन आजारी विद्यार्थ्यावर भामरागड येथे उपचार केले. अशा प्रकारची अत्यंत बिकट परिस्थिती संपूर्ण तालुक्यात आहे. गडचिरोली-भामरागड-लाहेरी, अहेरी-लाहेरी-भामरागड-कोठी, भामरागड-हिदूर, भामरागड-मन्नेराजाराम या मार्गाने महामंडळाच्या बसेस धावतात. परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बसचालकाला वाहन चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. एका आठवड्यामध्ये दोन ते तीन बसेस पंक्चर होतात, ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भामरागड तालुक्यातील बसवाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बसेस होतात पंक्चर
By admin | Updated: October 1, 2014 23:22 IST